साहित्य संमेलन बडोद्यातच व्हावे!
By Admin | Published: July 5, 2017 03:56 AM2017-07-05T03:56:05+5:302017-07-05T03:56:05+5:30
‘बडोदे येथे संमेलन आयोजित करण्यासाठी मराठी वाङ्मय परिषदेने प्रस्ताव पाठवलेला आहे. परिषद ही साहित्य महामंडळाची
मयूर देवकर/लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : ‘बडोदे येथे संमेलन आयोजित करण्यासाठी मराठी वाङ्मय परिषदेने प्रस्ताव पाठवलेला आहे. परिषद ही साहित्य महामंडळाची संलग्न संस्था असल्याने संमेलनाचा मान त्यांनाच मिळायला हवा. महामंडळाने अन्य स्थळांचा विचार तरी कशाला करावा,’ असा प्रश्न मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना उपस्थित केला. ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन दिल्लीत करण्याबाबतच्या साहित्य वर्तुळातील उत्साही चर्चांत ठाले-पाटील यांनी वर्ज्य सूर लावल्याने संमेलनस्थळावरून वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.
‘दिल्ली मराठी प्रतिष्ठान’ने दिल्ली येथे संमेलन भरविण्याचे रीतसर निमंत्रण दिल्यापासून साहित्यप्रेमींना हुरूप चढला आहे. बडोदे, पुणे, तळोधी बाळापूर (चंद्रपूर), हिवरा आश्रम (बुलडाणा) या ठिकाणांहूनही प्रस्ताव आले आहेत. मात्र, यंदा चर्चा केवळ दिल्लीचीच सुरू आहे. याबाबत ठाले-पाटील यांनी आश्चर्य व्यक्त केले. ‘बडोदे येथे मोठ्या संख्येने मराठी लोक राहतात. सयाजीराव गायकवाड महाराजांनी मराठीचे प्रचंड काम तेथे केले आहे. त्यांच्या कार्याची आठवण म्हणून बडोदे अगदी योग्य स्थळ आहे,’ असेही ते म्हणाले.
दरम्यान, गेल्या महिन्यात महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या अध्यक्षेखाली नागपूर येथे पार पडलेल्या बैठकीत स्थळ निवड समिती गठित करण्यात आली आहे. समिती १० सप्टेंबर रोजी महामंडळाच्या बैठकीत अहवाल सादर करणार आहे.
समितीच्या अहवालानंतरच निर्णय
संमेलन कुठे होणार, याचा अंतिम निर्णय स्थळ निवड समितीच्या अहवालानंतरच घेण्यात येणार आहे. समितीमध्ये घटक संस्थांचेही प्रतिनिधी आहेत. त्यामुळे सर्वांच्या मतांनुसारच निर्णय होईल.
- श्रीपाद जोशी, अध्यक्ष, अ. भा. मराठी साहित्य महामंडळ