लावणीच्या नजाकतीत रंगल्या सखी
By admin | Published: April 20, 2016 12:58 AM2016-04-20T00:58:43+5:302016-04-20T00:58:43+5:30
‘माझ्यावरती रसिकजनांच्या खिळल्या किती नजरा’, ‘सोडा राया सोडा हा नाद खुळा’, ‘ही पोरी साजूक तुपाची’ अशा एकाहून एक सरस उडत्या चालीच्या गाण्यांवर सादर झालेल्या लावण्यांनी सखींना मोहिनी
पुणे : ‘माझ्यावरती रसिकजनांच्या खिळल्या किती नजरा’, ‘सोडा राया सोडा हा नाद खुळा’, ‘ही पोरी साजूक तुपाची’ अशा एकाहून एक सरस उडत्या चालीच्या गाण्यांवर सादर झालेल्या लावण्यांनी सखींना मोहिनी घातली. प्रत्येक लावणीगणिक सखींचा उत्साह द्विगुणित होत गेला आणि सरतेशेवटी त्यांनीच या गाण्यांवर ठेका धरत आपल्यातील नृत्यकलेला वाट करून दिली.
निमित्त होते सुरश्री प्रोडक्शन आणि लोकमत सखी मंचच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या ‘नटरंगी नार’ या अनोख्या लावणी कार्यक्रमाचे. आपल्याकडील पुरुषप्रधान संस्कृतीत लावणी, तमाशाचा आनंद हीसुद्धा पुरुषांची मक्तेदारी समजली जात असताना ‘लोकमत सखी मंच’ने या गैरसमजुतीला फाटा देत महिलांना या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्याची संधी उपलब्ध करून दिली. ५००० हून अधिक महिलांनी लावणीच्या या बहारदार कार्यक्रमाला हजेरी लावत सायंकाळ ‘लावणी’मय केली.
लावणीतील प्रथेप्रमाणे मुजऱ्याने कार्यक्रमाला सुरुवात झाली. सुरेखा पुणेकर यांच्यासमवेत कार्यक्रमातील सर्व महिला कलावंतांनी मोहक
अदांनी मुजरा सादर करत
सर्वांना मोहिनी घातली आणि कार्यक्रम रंगतदार होणार असल्याची जणू नांदीच दिली. त्यानंतर
‘कन्हय्या, ये रे कन्हय्या’ या गवळण सादर केली. पारंपरिक बाजातला मुजरा, परंतु नव्या काळातले सादरीकरण करत ‘माझ्यावरती रसिकजनांच्या’ या लावणीने काळजाचा ठाव घेतला.
‘एकवीरेची पहाट होतेय’, ‘या कोळीवाड्याची मान, आई तुला देऊन’ अशा गाण्यांमधून देवीला साकडे घालण्यात आले. ‘पप्पी दे पारोला’, ‘गढुळाचं पाणी कशाला ढवळीलं’, ‘ही पोरी साजूक तुपातली’, ‘जरा सरकून बसा’, ‘घंटी मी वाजवली’, ‘तुझी चिमणी उडाली
भुर्र’ या गाण्यांनी महिलांना
मोहिनी घातली आणि नेहमीच्या कामाच्या रगाड्यातून बाहेर
पडून आनंदाचे काही क्षण व्यतीत करण्याची संधी दिली. सुनील
गोडांबे, दीपक काळे, जगन्नाथ, महेश लोखंडे यांनी लावण्यांना उत्तम साथसंगत केली.