मंटोबद्दल थोडेसे...

By admin | Published: July 24, 2016 02:41 AM2016-07-24T02:41:53+5:302016-07-24T02:41:53+5:30

मोठ्या प्रतिभावंताची, पण बदनाम झालेल्या मंटो या लेखकाची चटका लावणारी कहाणी ‘मंटो जिंदा है’ मध्ये वाचायला मिळाली होती. तिचाचा वसुधा सहस्त्रबुधे यांनी केलेला अनुवाद ‘मंटो-तप्त

Little bit about manto ... | मंटोबद्दल थोडेसे...

मंटोबद्दल थोडेसे...

Next

- रविप्रकाश कुलकर्णी

मोठ्या प्रतिभावंताची, पण बदनाम झालेल्या मंटो या लेखकाची चटका लावणारी कहाणी ‘मंटो जिंदा है’ मध्ये वाचायला मिळाली होती. तिचाचा वसुधा सहस्त्रबुधे यांनी केलेला अनुवाद ‘मंटो-तप्त सूर्याचा संताप’ या शीर्षकाखाली वाचनात आला, तेव्हा लक्षात आलं नाही, पण नंतर मात्र वाटलं, ही कहाणी विशेषत: अभिव्यक्ती स्वातंत्र्याची सध्या जी काही गळचेपी होते आहे, अशा काळात ही कथा अनेक वाचकांपर्यंत गेली पाहिजे.

आतासे रविवारी कुठल्याही कार्यक्रमाला जावेसे वाटत नाही. एक दिवस तरी लोकल- रिक्षांचा ताप टाळण्याकडे माझा कल असतो. त्यात पुन्हा रविवार लोकलचा मेगा ब्लॉक वगैरे भानगडी असल्या, तर नकोच नको असे वाटते. कारण तो सगळा प्रकार महाभयानक वैताग आणतो. असा सगळा अनुभव असतानासुद्धा रविवारी १७ जुलैला ठाण्याच्या मराठी ग्रंथ संग्रहायलयात सकाळी साडेदहा वाजता कार्यक्रमाला मी जाणार हे आठवडाभर आधीच जाहीर करून टाकले असल्यामुळे घरच्यांसकट सगळयांना आश्चर्य वाटले.
‘रविवार आहे हे माहीत आहे का? एवढ्या सकाळी कुठे प्रकाशन असते का?’ असा काळजीचा सल्ला गृहखात्याकडून नाही येणार तर दुसऱ्या कुणाकडून येणार!
पण मी ठासून सांगितलं, ‘मला सगळं ठाऊक आहे तरी मी जाणार आहे.’ त्याप्रमाणे मी गेलोदेखील. पुस्तक प्रकाशनाच्या वेळी कथावाचन, वृत्तचित्र वगैरे गोष्टी कशाला हव्यात? इतरही फाफट पसारा टाळून तास-दीड तास अगदी डोक्यावरून पाणी म्हणजे दोन तासांत पुस्तक प्रकाशन सोहळा आटोपायला हवा, पण हा प्रकाशन सोहळा संपला, तेव्हा दीड वाजून गेला होता. असे म्हणायचे कारण नंतर मी घड्याळ पाहायचे सोडून दिले होते-हताश होऊन....
असे सगळे होऊनसुद्धा माझे पित्त उसळले नाही. वैतागलोदेखील नाही! एवढा मनावर मी काबू कसा काय ठेवू शकलो?
याचं कारण मंटो-सदाअत हसन मंटो!?
उर्दुतला हा मोठा कथाकार, ज्याचे वर्णन ‘अफसाना निगार मंटो’ असे केले जाते, कधी-कधी ‘बेलाक जिंदगी का बादशहा मंटो’ असं केलं जातं. अता मंटोची एक नाही तर दोन पुस्तके-मंटोच्या निवडक कथा, प्रतीक्षा मंटोची याचे प्रकाशन होते. प्रतीक्षा मंटोची पुस्तकाचे मूळ लेखक डॉ. नरेंद्र मोहन आणि दोन्ही अनुवादिका डॉ. वसुधा सहस्त्रबुद्धे.
मंटोच्या बाबतीत असा एकदम दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळायोग या पूर्वीही कधी आला असेल, असे वाटत नाही. विशेष म्हणजे, दोन्ही पुस्तके विजय प्रकाशन, नागपूर यांच्यातर्फे प्रकाशित झाली आहेत.
दोन-तीन वर्षांपूर्वी डॉ. नरेंद्र मोहन यांनी लिहिलेल्या मंटो चारित्र्याचा अनुवाद डॉ. वसुधा सहस्त्रबुद्धे यांनी केला असून, तो विजय प्रकाशनतर्फेच प्रकाशित झाला आहे.
नरेंद्र मोहन हे ‘मंटो’ विषयाने झपाटलेले आहेत. ते वसुधा सहस्त्रबुद्धे यांचे प्रेरणास्थान आहेत, पण विजय प्रकाशनचे सचिन उपाध्याय हेदेखील, तसेच मंटोने झपाटले आहेत.
नरेंद्र मोहनकृत ‘मंटो जिंदा है’ हे चरित्र विलक्षण आहे. लेखकाने मंटोच्या आयुष्यातील घटनांचा जो मागोवा म्हणजे, त्याचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न केला आहे, तो असाधारण असाच आहे.
पण मंटो म्हटले की आठवतात त्या त्याच्या ‘टोबा टेकासिंह खोल दो’, ‘टिटवाल का कुत्रा’, ‘नंगी आवाज’, ‘सियाह’ अशासारख्या कथा, ज्याने माणसातल्या वासनांचे आणि त्यातील जनावराचे रूप उघड करून दाखवले. प्रस्थापित समाजाला तेव्हा या गोष्टी झेपल्या नाहीत. मंटोवर ‘अश्लीलतेचा’ केवळ ठपकाच बसला नाही, तर त्याच्यावर खटले भरले गेले. ब्रिटिश भारतात आणि नंतर पाकिस्तानातदेखील या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या लढ्यात मंटोने एकाकीपणे झुंज दिली खरी, पण त्याचाच एक परिणाम म्हणून मंटोला वेड लागण्यापर्यंत परिस्थिती गेली. फाळणी, जातीय दंगलीमागची मानसिकता, त्यात होरपळलेल्या लोकांच्या कथा मंटोने लिहिल्या, ज्या आजच्या परिस्थितीतदेखील ताज्या ठरतात. मंटो कुणाची बाजू घेतो, तर माणसांची. मंटोचे श्रेष्ठत्व इथे आहे. या सगळ्याचा मागोवा नरेंद्र मोहन यांनी साक्षेपाने घेतला आहे. ते म्हणतात, ‘शारीरिक रूपात मंटो हिंदुस्थानामधून पाकिस्तानाला मुंबईहून लाहोरला गेला हे खरे आहे, परंतु दोन्ही देश आणि महानगरामध्ये तो सदैव पंख फडफडवीत राहिला. तो आपल्या कथेच्या राखेतून पुन्हा जिवंत होत राहिला आणि लोकांच्या स्मरणात चमकत राहिला. विसाव्या शतकातच नव्हे, एकविसाव्या शतकातही आणि कदाचित येणाऱ्या शतकातही हा क्रम चालूच राहील.
असा हा प्रकाशन समारंभ लांबत गेला. श्रोत्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहत होता. अशा गोष्टी जरी असल्या, तरी मंटोची कथा, त्याच चरित्र...
हे काम सहज-सोपं नव्हते. म्हणूल लेखकाचा अनुवादिकेचे आणि प्रकाशकाचे अभिनंदन करायचं होते, म्हणून मी थांबून राहिलो.
चांगल्या कामासाठी लाख चुका माफ करायलाच हव्या!
ताजा कलम - ‘प्रतीक्षा मंटो’चीमध्ये नरेंद्र मोहन यांनी एका ठिकाणी म्हटले आहे, मंटो जर खरच आज आपल्यामध्ये आला आणि त्याने आपल्या कथांद्वारे धार्मिक दुराग्रह आणि राजकारणातील हरामखोरीची बिंग फोडण्यात सुरुवात केली, तर त्याच्या कथा सहन केल्या जातील? त्यात जिवंत राहण्याची तरी अनुमती असेल की नसेल? यावरून तरी मंटो काय चीज होती, हे कळावे.

Web Title: Little bit about manto ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.