निराधार ‘मालन’ला थोडगेंचा पितृत्वाचा आधार
By admin | Published: June 26, 2015 01:09 AM2015-06-26T01:09:04+5:302015-06-26T01:09:04+5:30
मालन-सुनील यांचा आज विवाह : शाहू जयंतीच्या मुहूर्तावर समतेचा संदेश
कोल्हापूर : मालन नावाची लहान मुलगी आधार मिळावा म्हणून २००८ साली चालत किरवे (ता. गगनबावडा) येथे आली. काही दिवस गगनबावड्यात राहिल्यानंतर या मुलीला लोकांनी माजी पंचायत समिती सभापती बंकट थोडगे यांच्या घरी आणून सोडले. त्यानंतर थोडगे यांनी तिचा पाचवी मुलगी म्हणून सांभाळ केला. मालनचा आज, शुक्रवारी राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त हिंदू पद्धतीने निवडे (ता. गगनबावडा) येथील सुनील आनंदराव खाडे यांच्याशी विवाह होणार आहे.
वडणगे (ता. करवीर) येथील गरीब कुटुंबातील मालन ही निराधार मुलगी किरवे (ता. गगनबावडा) येथे चालत आली होती. तेथे लोकांनी तिची विचारपूस करून तिला काही दिवस तेथेच ठेवून घेतले. पुढे काही दिवसांनी तिला तेथील लोकांनी तत्कालीन पंचायत समिती सभापती बंकट थोडगे यांच्या घरी आणून सोडले. थोडगे यांनी तिला गगनबावडा येथील केंद्रीय शाळा कस्तुरबा गांधी विद्यालय येथे चौथीच्या वर्गात दाखल केले. दिवाळीच्या सुटीत सर्व मुली आपापल्या घरी गेल्या. मात्र, मालनचे कोणी नसल्याने ती शाळेच्या वसतिगृहातच राहिली. ही बाब मुख्याध्यापिकांनी थोडगे यांच्या कानांवर घातली. क्षणाचाही विचार न करता थोडगे यांनी तिचा आपल्या तमन्ना, उबेद, सिमरन, जब्बीन अशा चार अपत्यांबरोबरच पाचवं अपत्य म्हणून सांभाळ केला. मालननेही सर्वांबरोबर राहतच कमी कालावधीत त्यांना आपलेसे केले. बघता-बघता मालन विवाहयोग्य झाली. निवडे (ता. गगनबावडा) येथील कै. आनंदराव खाडे यांचे द्वितीय पुत्र सुनील यांच्याशी मालनचा विवाह निश्चित झाला.
विशेष म्हणजे सामाजिक समतेचा संदेश देणारे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज, शुक्रवारी सायंकाळी चार वाजता दत्त मंदिर कार्यालय, निवडे येथे हा विवाह होणार आहे. यावेळी मुस्लिम समाज कन्यादान करणार आहे; तर ही कन्या हिंदू धर्मामध्ये वैवाहिक जीवन व्यतित करणार आहे. व्यासपीठावरील व्यक्तीच केवळ अक्षता टाकणार असून बाकीचे उपस्थित फुलांच्या पाकळ्या टाकणार आहेत. अक्षतांच्या रूपाने वाया जाणारे धान्य गरीब कुटुंबाला दिले जाणार आहे.
लग्न सोहळ््यासाठी हे राबताहेत
या समतेचे प्रतीक असणाऱ्या विवाहाचे आयोजन शिव-शाहू-फुले-आंबेडकर-अण्णा भाऊ साठे विचारमंच, सुन्नत जमात, तिसंगीवाडी, फकीरवाडी, निवडेवाडी व मस्जिदवार जमात, बंकट थोडगे परिवार, शाहीर आझाद लोककला सांस्कृतिक मंच, कोल्हापूर, स्वामी समर्थ केबल नेटवर्क, अभिमन्यू गु्रप (निवडे), न्यू आझाद तरुण मंडळ, तिसंगी व गावातील सर्व तरुण मंडळी या सोहळ्यास कुटुंबीयांसह उपस्थित राहणार आहेत.