रेल्वेचे मोबाइल अॅप वापरणारे कमीच
By admin | Published: February 3, 2017 01:03 AM2017-02-03T01:03:19+5:302017-02-03T01:03:19+5:30
रेल्वेच्या मोबाइल तिकीट सुविधेला मिळत असलेल्या कमी प्रतिसादामुळे या सेवेत काही बदल करत आणखी काही सुविधा क्रिस (सेंटर फॉर रेल्वे इन्फर्मेशन) संस्थेकडून उपलब्ध
मुंबई : रेल्वेच्या मोबाइल तिकीट सुविधेला मिळत असलेल्या कमी प्रतिसादामुळे या सेवेत काही बदल करत आणखी काही सुविधा क्रिस (सेंटर फॉर रेल्वे इन्फर्मेशन) संस्थेकडून उपलब्ध करण्यात आल्या आहेत. दोन व्हर्चुअल वॉलेट्सचा पर्याय देतानाच मोबाइल तिकीट सेवेत छापील प्रतीचा पर्यायही देण्यात आला आहे. त्यामुळे प्रतिसाद वाढेल अशी आशा रेल्वेकडून व्यक्त केली जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे रेल्वेचे मोबाइल अॅप डाऊनलोड करणारे दहा लाख असून प्रत्यक्षात वापरणारे जवळपास चार हजार असल्याचे निदर्शनास आले आहे. तिकीट खिडक्यांवर तिकीट मिळवण्यासाठी तासन्तास प्रवाशांना उभे राहावे लागत असल्याने रेल्वेकडून तिकिटांसाठी अनेक पर्याय उपलब्ध केले जात आहेत. त्यातच मोबाइल तिकीट सेवा सुरू करताना २0१५ मध्ये यूटीएस आॅन मोबाइल हे अॅप रेल्वेच्या क्रिसकडून उपलब्ध करण्यात आले. पेपरलेस तिकीट सुविधा असणाऱ्या या सेवेत जीपीएस प्रणालीत तांत्रिक अडथळे येत असल्याने तिकीट काढताना प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत असे. हा अडथळा दूर करत आता २५ जानेवारीपासून छापील प्रतीची सुविधा उपलब्ध करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील आणि क्रिसचे मुंबईतील महाव्यवस्थापक उदय बोभाटे यांनी दिली. या निर्णयानंतर क्रिसने आर वॉलेटसह प्रवाशांना आणखी दोन व्हर्चुअल वॉलेट्सचाही पर्याय दिला असल्याचे सांगितले. नोव्हेंबरमध्ये नोटाबंदीनंतर या अॅपला मिळणाऱ्या प्रतिसादात थोडी वाढ झाली
आहे. (प्रतिनिधी)
दररोज ४५०० तिकिटे
- ७ नोव्हेंबरअगोदर अॅपद्वारे अडीच ते तीन हजार तिकिटे काढली जात होती. आता यात वाढ होऊन ४,५00 तिकिटे काढली जातात.