शुक्रवारी राज्यात तुरळक पावसाची शक्यता ; हवामान विभागाचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 08:22 PM2020-02-25T20:22:22+5:302020-02-25T20:24:06+5:30
उत्तरेकडील वाऱ्यांच्या दबावामुळे राज्यात तापमानात घट झाली असून येत्या शुक्रवारी राज्यातील काही भागांमध्ये तुरळक पावसाची शक्यता आहे.
पुणे : उत्तर भारतातील थंड हवेचा प्रभाव वाढल्याने सोमवार रात्रीपासून राज्यातील किमान तापमानात घसरण झाली असून मंगळवारी दिवसाच्या तापमानात सरासरीच्या तुलनेत घट झाल्याचे दिसून आले आहे. मंगळवारी रात्रीच्या तापमानात आणखी किंचित घट होण्याची शक्यता आहे. हा परिणाम बुधवार दुपारपर्यंत राहण्याची शक्यता आहे. उत्तरेकडील वाऱ्यांच्या दबावामुळे राज्यात सर्वात कमी किमान तापमान नाशिक येथे 13 अंश सेल्सिअस नोंदविले गेले. तर मुंबईत सांताक्रुझ येथे सर्वाधिक कमाल तापमान 37.4 अंश सेल्सिअसची नोंद झाली़ राज्यात येत्या 29 फेब्रुवारीला मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
उन्हाळा सुरु झाला असे संकेत वातावरण देत असतानाच अचानक सोमवारी रात्रीपासून थंड वारे वाहू लागले. मध्य महाराष्ट्रातील बहुतेक ठिकाणच्या मंगळवारच्या कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत घट झाल्याचे दिसून आले आहे. तसेच विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. याबाबत पुणेहवामान विभागाचे प्रमुख डॉ़ अनुपम कश्यपी यांनी सांगितले की, वातावरणातील खालच्या स्तरावर उत्तरेकडील थंड हवेचा प्रभाव सोमवारी सायंकाळनंतर अचानक वाढला. त्यामुळे राज्यातील तापमानात विशेषत: मध्य महाराष्ट्र व विदर्भातील बहुतांश ठिकाणच्या कमाल व किमान तापमानात घट झाली आहे. त्यात मंगळवारी रात्रीही आणखी किंचित घट होण्याची शक्यता आहे. हा प्रभाव बुधवारी दुपारपर्यंत राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर तापमानात वाढ होत जाईल. फेब्रुवारीच्या अखेरच्या दिवशी 28 व 29 फेब्रुवारीला राज्यातील अनेक भागात ढगाळ हवामान असेल. तसेच तुरळक ठिकाणी पावसाची एखाद दुसरी सर येण्याची शक्यता आहे.
28 फेब्रुवारी रोजी मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, गोवा व विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. 29 फेब्रुवारी रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.२९ फेबुवारी रोजी सातारा, सोलापूर, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये तुरळक पावसाची शक्यता आहे. तर औरंगाबाद, बीड, परभणी, पुणे, गोंदिया या जिल्ह्यात आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे.