यकृतदानामुळे महिलेला मिळाले जीवनदान
By admin | Published: April 20, 2015 02:49 AM2015-04-20T02:49:15+5:302015-04-20T02:49:15+5:30
किडनीच्या आजाराने ग्रस्त असलेल्या ठाण्यातील ५७वर्षीय महिलेने एका महिलेला जीवनदान दिले. ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात दाखल
मुंबई : किडनीच्या आजाराने ग्रस्त असलेल्या ठाण्यातील ५७वर्षीय महिलेने एका महिलेला जीवनदान दिले. ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात दाखल असलेल्या ५७वर्षीय महिलेला गुरुवार, १६ एप्रिलला सायंकाळी ब्रेनडेड घोषित करण्यात आले. यानंतर तिच्या कुटुंबीयांनी यकृतदान करण्याचा निर्णय घेतल्यामुळे मालाड येथे राहणाऱ्या ५३वर्षीय महिलेला जीवनदान मिळाले आहे. वर्षातील हे १६वे कॅडेव्हर डोनेशन झाले आहे.
यंदा कॅडेव्हर डोनेशनच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. चार महिन्यांत १६ कॅडेव्हर डोनेशन झाली आहेत. जनजागृतीमुळे कॅडेव्हर डोनेशनच्या प्रमाणात वाढ झाल्यास अनेकांना जीवनदान मिळू शकते, अशी आशा क्षेत्रातील तज्ज्ञांना वाटते आहे.
विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीने दिलेल्या माहितीनुसार, ठाण्यातील ५७वर्षीय महिला गेल्या काही महिन्यांपासून किडनीच्या आजाराने ग्रस्त होती. या महिलेला डायलेसिस सुरू होते. गेल्या १२ वर्षांपासून या महिलेला उच्च रक्तदाबाचा त्रास होता. सोमवार, १३ एप्रिलला या महिलेला ज्युपिटर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. गुरुवारी संध्याकाळी या महिलेला ब्रेन हॅमरेज झाले. यानंतर तिला ब्रेनडेड घोषित करण्यात आले. या महिलेला किडनीचा आजार असल्याने किडनी दान करणे शक्य नव्हते. यामुळे तिच्या नातेवाइकांनी यकृतदान करण्याचा निर्णय घेतला. ज्युपिटर रुग्णालयातील एका महिला रुग्णाला यकृत देण्यात आले. यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया शुक्रवारी झाली असून, त्या महिलेची प्रकृती स्थिर आहे.
गेल्या वर्षी, ७१ किडनी, ३६ यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्या असून, ४१ कॅडेव्हर डोनेशन झाले होते. २०१३मध्ये ३६ किडनी आणि १९ यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्या
होत्या. तर, २४ कॅडेव्हर डोनेशन झाली होती. (प्रतिनिधी)