सा.बां.चे दुर्लक्ष रहिवाशांच्या जीवावर
By Admin | Published: July 12, 2017 03:36 AM2017-07-12T03:36:13+5:302017-07-12T03:36:13+5:30
झाडे कोसळण्याच्या घटना घडत असताना बारा बंगल्यातील इंद्रायणी बंगल्याच्या आवारात असलेल्या एका घरावर झाड कोसळून घराचे मोठे नुकसान झाले
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : पावसाळ््यात झाडे कोसळण्याच्या घटना घडत असताना बारा बंगल्यातील इंद्रायणी बंगल्याच्या आवारात असलेल्या एका घरावर झाड कोसळून घराचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत जिवीतहानी टळली. सार्वजनिक बांधकाम विभागाला या झाडाबाबतची तक्रार करुनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने ही दुर्दैवी घटना घडली, यात जीवितहानी देखील होण्याची शक्यता होती, असा संताप तेथे राहणाऱ्या रहिवाशांनी व्यक्त केला. मात्र, याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठामपा एकमेकांकडे अंगुलीनिर्देश करीत आहेत.
ठाणे पूर्व येथील बारा बंगला परिसरातील इंद्रायणी बंगल्याच्या आवारातील शासकीय सदनिकांमध्ये अनेक वर्षापासून काही कुटुंब राहत आहेत. ठाणे जिल्हा सत्र न्यायाधीश यांच्याकडे घरकामाला असणाऱ्या पुष्पा महामुनी यांच्या घरावर दुपारी २.४५ वाजण्याच्या सुमारास अचानक झाड कोसळले. या घटनेत त्यांच्या घराचे छप्पर तुटले असून घरासमोर असलेली सर्व भांडीदेखील तुटली आहेत. तसेच, घराच्या अंतर्गत भागाचेदेखील नुकसान झाले आहे. हे झाड मोडकळीस आल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाला काही दिवसांपूर्वी कळविण्यात आले होते. परंतु, त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यांच्या दुर्लक्षपणामुळे ही घटना घडली असल्याचा आरोप या सदनिकेत राहणाऱ्या कुटुंबियांनी केला. बारा बंगल्यातील २५ झाडे ही धोकादायक असल्याचे ठाणे महापालिकेला कळविण्यात आले होते. परंतु, याबाबत पालिकेने कोणताही प्रतिसाद दिला नाही. आम्हाला सर्व झाडे पाहणे शक्य होत नाही. तसेच, रहिवाशांकडून कोणतीही तक्रार प्राप्त झाली नसल्याची सारवासारव तेथील संबंधित कर्मचाऱ्याने केली. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून इंद्रायणी बंगल्यातील झाडांबाबतच्या कोणत्याही तक्रारी ठाणे महापालिकेकडे आले नसल्याचे संबंधित विभागाने स्पष्ट केले. प्रत्येक बंगल्यातील शासकीय सदनिकांच्या आजूबाजूला असलेल्या झाडांची काळजी घेणे हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे काम आहे.परंतु, या विभागाकडून नेहमीच दुर्लक्ष होत असल्याची नाराजी येथील रहिवाशांनी व्यक्त केली. तसेच, या सदनिकांच्या आवारातील कोणतेही झाड कधीही कोसळू शकते, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, झाड कोसळल्याची माहिती मिळताच महापालिकेच्या संबंधित विभागाने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.