तिघांना जीवनदान
By admin | Published: February 26, 2015 02:33 AM2015-02-26T02:33:59+5:302015-02-26T02:33:59+5:30
अवयव निकामी झाल्याने अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता अनेक रुग्णांना भासते. पण अवयवदानाचे प्रमाण कमी
मुंबई : अवयव निकामी झाल्याने अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता अनेक रुग्णांना भासते. पण अवयवदानाचे प्रमाण कमी असल्यामुळे अनेक रुग्णांना अवयव मिळत नाहीत. २०१५ मध्ये या चित्रात काही प्रमाणात बदल होण्याची सकारात्मक चिन्हे दिसत आहेत. कारण २३ फेब्रुवारी रोजी या वर्षातले सहावे कॅडेव्हर डोनेशन झाले. २३ फेब्रुवारीला डोंबिवली येथे राहणाऱ्या ६६ वर्षीय जयंतीलाल भानुशाली यांचे यकृत, किडनी आणि डोळे दान केल्यामुळे तीन जणांना जीवनदान मिळाले आहे.
जयंतीलाल भानुशाली यांना वाशीच्या एका रुग्णालयात दाखल केले होते. त्यांना ब्रेन हॅमरेज झाल्याचे निदान झाले. यानंतर त्यांना पुढच्या उपचारासाठी ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात हलवण्यात आले. या रुग्णालयातील काही तपासण्यानंतर जयंतीलाल ब्रेनडेड झाल्याचे घोषित करण्यात आले. हे सर्व अचानकच घडले. याआधी अवयवदानाविषयी आम्ही कधी विचार केला नव्हता. पण, भानुशाली यांना ब्रेनडेड
घोषित केल्यावर डॉक्टरांनी अवयवदानाविषयी सांगितले. त्यानंतर कुटुंबियांनी त्यांचे यकृत, किडनी आणि डोळे दान करण्याचा निर्णय घेतला, असे पुतण्या नीलेश भानुशाली यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
गेल्या काही वर्षांपेक्षा २०१५ च्या सुरुवातीच्या दोन महिन्यांत कॅडेव्हर डोनेशन झाली आहेत.
(प्रतिनिधी)