गणपतीपुळेत राहण्याची अलिशान सोय २० रुपयात!
By Admin | Published: May 20, 2015 10:52 PM2015-05-20T22:52:57+5:302015-05-21T00:06:14+5:30
भक्तनिवास : आज होणार भक्तार्पण सोहळा
रत्नागिरी : हजारो रुपये मोजूनही अनेकवेळा राहण्याची सोय न झाल्याने पर्यटकांच्या पदरी निराशा येते. मात्र, अशा निराश पर्यटकांसाठी शुभवर्तमान आहे. गणपतीपुळेत आता केवळ २० रुपयांत राहण्याची सोय होणार आहे आणि तीही एका अलिशान इमारतीत. ही सेवा मिळणार आहे देवस्थानच्या भक्त निवासात आणि उद्या गुरुवारी त्याचे भक्तार्पण होत आहे.
सकाळी १0 वाजता वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याहस्ते हा भक्तार्पर्ण कार्यक्रम होणार आहे. यावेळी पं. वसंतराव गाडगीळ, शृंगेरी पीठाचे जगत्गुरू श्री शंकराचार्य उपस्थित राहणार आहेत.
गणपतीपुळे संस्थानने काही वर्षांपूर्वी स्वत:चे भक्त निवास उभारण्याचे स्वप्न पाहिले होते. ते आता पूर्णत्त्वास गेले आहे. गणपतीपुळेपासून नजीकच हे भक्त निवास उभारण्यात आले आहे. ७३ खोल्यांचे हे अलिशान भक्तनिवास गुुरुवारपासून उपलब्ध होणार आहे. २० रुपयांपासून ते ३०० रुपयांपर्यंत माफक भाडे भरुन या ठिकाणी राहता येणार आहे.
गणपतीपुळे हा देशी - विदेशी पर्यटकांचा आकर्षणाचा विषय ठरला आहे. गणरायाचा आशीर्वाद आणि समुद्रस्नान यामुळे दरवर्षी लाखो भाविक या पर्यटन स्थळाला भेट देतात. गणपतीपुळे येथे राहायचे असेल तर १२०० रुपयांपासून ते ३००० रुपयांपर्यंत भाडे भरावे लागते. त्यामुळे आता या पर्यटकांची होणारी लूट थांबणार आहे.
एकावेळी एक हजारहून जास्त लोक राहू शकतील, असे ११ कोटींचे हे अलिशान भक्त निवास मंदिर समितीने उभारले आहे. (प्रतिनिधी)
लवकरच आॅनलाईन
भक्त निवासामध्ये राहण्यासाठी लवकरच आॅनलाईन बुकिंगची सुविधाही उपलब्ध केली जाणार आहे, अशी माहिती गणपतीपुळे देवस्थान कमिटीचे अध्यक्ष डॉ. विवेक भिडे यांनी दिली.
गणपतीपुळे संस्थानचे ७३ खोल्यांचे भक्तनिवास पूर्ण.
सध्या पुळेत राहण्यासाठी १२००पासून ३००० हजार रुपये भरावे लागते भाडे.