मुक्त जीवन जगताना...

By admin | Published: December 24, 2016 11:41 PM2016-12-24T23:41:05+5:302016-12-24T23:41:05+5:30

ढोंगीपणामुळे वैयक्तिक जीवनात नात्याचा प्रामाणिकपणा व पारदर्शीपणा नष्ट होतो. एक पती म्हणून, एक माता म्हणून वा एक बंधू म्हणून तुम्ही जेव्हा कृत्रिम नाती जगता तेव्हा

Living a free life ... | मुक्त जीवन जगताना...

मुक्त जीवन जगताना...

Next

- डॉ. शुभांगी पारकर

ढोंगीपणामुळे वैयक्तिक जीवनात नात्याचा प्रामाणिकपणा व पारदर्शीपणा नष्ट होतो. एक पती म्हणून, एक माता म्हणून वा एक बंधू म्हणून तुम्ही जेव्हा कृत्रिम नाती जगता तेव्हा तुम्हाला आप्तेष्टांकडून मिळणारे प्रेम हे त्या भूमिकेवरचे असते. त्या वेळी तुम्हाला स्वत:ला तो पोकळपणा अधिक जाणवतो. बढाईच्या दुनियेत जगणाऱ्या दांभिक माणसाकडे दांभिक आत्मीयता असते. आपण जो छाप लोकांना दाखवतो आहोत तो नसेल तर हा आदर हे प्रेम खरे आहे व ते आपल्याला खरंच मिळेल का, हा प्रश्न माणसाला भेडसावत राहतोच. प्रत्येकाला आपण ‘खास’ असावे असे वाटते आणि ते खरे तर स्वार्थीपणाचे द्योतक आहे. या स्वार्थीपणात माणूस स्वत:शीच स्वत:बद्दल खोटे बोलत राहतो आणि या एकाच आयुष्यात स्वत:च्या सुंदर अस्तित्वापासून व आत्म्यापासून दूर जातो. स्वत:बद्दलचा आत्मविश्वास कमी असतो म्हणून दुसऱ्याच्या अपेक्षेप्रमाणे जगावे लागते. आपण जसे आहोत तसे जगण्यासाठी नैसर्गिक मुक्तपणाची गरज असते. आजूबाजूला असणाऱ्या बेगडी प्रतिष्ठेच्या बुरख्यात न जाता आहे तसे जगावे या तत्त्वावर विश्वास असावा लागतो. हे नैसर्गिक स्वातंत्र्य जगायचे तर अवतीभवतीच्या वातावरणाचा व विशेषत: माणसांच्या कृत्रिम बंधनातून स्वत:ला मुक्त ठेवण्यातच शहाणपणा आहे.

तिचा प्रेमभंग झाला होता. पण आपण प्रेमात पडून रोमँटिक आयुष्याचा एक वेगळा अनुभव घ्यावा, असे तिला वाटत होते. जेव्हा ती त्याला भेटली तेव्हा त्याच्या रूपाचा, शिक्षणाचा व मॅनर्सचा तिच्यावर चांगलाच परिणाम झाला होता. खूप भाळली ती त्याच्यावर. पण सहा ते आठ महिन्यांच्या काळातच त्याने तिच्याशी त्याच्या आईला पसंत नाही म्हणून पे्रमाचे नाते संपवायचे ठरविले. आपण प्रेमात फसलो या जाणिवेने तिच्या पायाखालची जमीन सरकली. काही दिवसांनी ती थोडीशी भानावर आली तेव्हा तिच्यातली प्रगल्भता, प्रामाणिकपणे तिला काहीतरी समजावून गेली. तिला आपल्या इतर मित्रमैत्रिणींचे बॉयफ्रेंड्स व गर्लफ्रेंड्स पाहून आपल्याला काहीतरी सापडत नाही, काहीतरी कमी आहे. आपण इतरांहून थोडे वेगळे भासत आहोत, असे वाटायचे. शेवटी तिला अशीही जाणीव झाली की आपण काही इतरांसारखे रोमँटिक होऊ शकत नाही. खरंतर, ती वास्तवातली रोमँटिक भूमिका तिला पेलवली नव्हती. त्या प्रेमाच्या दुनियेत बळेच रमण्यासाठी स्वत:मध्ये मनाला न रुचणारे, न पचणारे बदल ती करत होती. तिच्या नैसर्गिक सरळसाध्या व्यक्तिमत्त्वाला न शोभणारा भंपकपणा आणताना मनाची अस्वस्थता सतत अनुभवत होती. स्वत:बद्दल एक वेगळा ठसा निर्माण करण्याच्या नादात, दुसऱ्या मित्रमैत्रिणींच्या ग्रुपमध्ये आपण सामावले पाहिजे. या तिच्या गरजेपोटी ती स्वत:लाच विसरत चालली होती. हे आयुष्याच्या टप्प्यावर अनेक जणांना जाणवत असते. आपण स्वत: जे नाही ते आहोत हे सिद्ध करण्याच्या प्रयत्नांत अनेक जण स्वत:ला हरवून बसतात. स्वत:चे रंग बदलतात.
अर्थात, एक माणूस म्हणून आपण स्वत: जसे आहोत तसे जन्मापासून सहजी घडूच शकत नाही. आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर, अगदी आपण मूल असल्यापासूनच प्रौढ होईस्तोवर कसे वागावे याचे शिक्षण आपल्याला प्रसंगानुरूप दिले जाते. आधी आईवडिलांशी कसे वागायचे, मग भावंडाशी कसे वागायचे, नंतर शाळेत कसे वागायचे इ.
माणसाला मुळात एखाद्या भूमिकेत शिरायचे असेल तर त्या भूमिकेचा गाभा समजून घ्यावा लागतो. स्वत:ला एका मित्राच्या भूमिकेत समजावून घेताना आपले मित्र आपल्याशी कसे वागतात, त्यानुरूप आपण त्यांच्याशी कसे वागायचे, याचा अंदाज आपल्याला घ्यावा लागतो. आईवडिलांशी त्यांचा पुत्र म्हणून वागतानासुद्धा आपण काही सामाजिक आणि काही सांस्कृतिक बाबी आपल्या व्यक्तिमत्त्वात विकसित करीत असतो. ज्या दृष्टीकोनातून आपण स्वत:कडे पाहत असतो तो आपल्या आयुष्यातील विविध अनुभवांतून आपल्यात एकरूप होत असतो. आपल्या नकळत आपले व्यक्तिमत्त्व आयुष्यातली बऱ्यावाईट अनुभवांतून घडत असते. यात अनेकवेळा कृत्रिमपणा असतो. आपण जी काही कृती करणार आहोत ती मुळातच इतरांना आवडेल की नाही यावर बरेच अवलंबून असते. सगळे अनेकदा वरचरचे चेहऱ्यावरच्या मेकअपसारखे असते. खरा चेहरा कुणाला दिसत नाही. अगदी आपल्यालासुद्धा ओळखीचा वाटत नाही. सतत टेंभा मिरवत असतो. आयुष्याच्या प्रामाणिक अनुभवातून प्रगल्भ झाल्यावर आपल्या लक्षात येते की, आपल्याला आपण जसे आहोत तसे वागायला हवे होते. पण बऱ्याच वेळा समाजाचे काही अलिखित नियम हे सामाजिक नीतिमूल्यांच्या जपणुकीसाठी असतात. त्या नियमांचे पालन त्या वेळी करणे आवश्यक असते आणि ते सर्वांच्या फायद्याचेच असते. जेव्हा आपल्याला बेकाबू वाटते, आक्रमक वाटते तेव्हा स्वत:ला काबूत ठेवण्यासाठी आपण नम्र आहोत वा शांत आहोत या भूमिकेत शिरणे आपल्या व दुसऱ्याच्या फायद्याचेच आहे. आपल्यात काही कमतरता असतात अशावेळी आपल्या त्या कमतरतेवर मात करताना आपण कसे उत्कृष्ट आहोत याची जगावर छाप पाडायला हरकत नाही. कारण ही छाप पाडताना आपण प्रचंड कष्ट करत असतो. आपली क्षमता उत्तम आहे हे दाखवायच्या प्रयत्नात आपण असे काही गुंततो की, कालांतराने आपण ज्या काल्पनिक जगात वावरतो त्या जगात खरंच शिरतो. आपल्याला आपल्यात ज्या व्यक्तीची अपेक्षा असते ती आपणच घडवतो.
सामाजिक प्रतिष्ठा जगण्यासाठी उपयोगी नसते तेव्हा स्वत:वर दांभिकतेचे बंधन घालायची गरज नाही. ज्या लोकांसाठी आपण हे करतो त्यांना आपल्या आयुष्यातच रमायचे असते. अकृत्रिम मुक्त जीवन जगताना लोकांना जो निर्भेळ आनंद मिळतो तो आपण तरी का गमवावा. खट्टामिठा अनुभव आयुष्याचा अविभाज्य भाग आहे जो स्वीकारला तर जगणे सुकर होऊ शकते. खरंतर काही माणसांना दुसऱ्या लोकांच्या जगात रमण्याची खूप गरज वाटत असावी किंवा ते फक्त कागदावरच प्रेम करीत असावेत किंवा ते स्वत:च्या अस्तित्वाबद्दल इतके भ्रमात असतात की त्यांना स्वत:ला दुसऱ्याच्या आभासी जगात राहणे जास्त भावत असते. एखाद्याला तुम्ही जे आहात, जसे आहात तसे स्वीकार्य नसेल तर अशा माणसाबरोबर तुम्ही जिवाच्या आकांताने फरफटत जगण्यात अर्थच नाही. आपला अमूल्य वेळ या माणसांनी आपल्याला स्वीकारावं म्हणून खर्च करायचा; आणि त्यांनी आपल्याला विदूषक बनवायचे व चित्रविचित्र कृती करायला भाग पाडायचे असे जीवन जगावे लागणे म्हणजे ती अशा लोकांची जीवंत विटंबना असते. कधीकधी एखादा माणूस कलाकारासारखा एखाद्या भूमिकेत गरज असेल तेव्हा शिरतो; पण सहजगत्या त्यातून बाहेर येऊन स्वत:चे मुक्त जीवनही जगू शकतो.

Web Title: Living a free life ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.