परीक्षेला बसण्याची सक्ती नाही, एलएलएमच्या विद्यार्थ्यांना दिलासा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 03:38 AM2018-01-23T03:38:56+5:302018-01-23T03:39:12+5:30
एलएलएमची पहिली सत्र परीक्षा पुढे ढकलण्यास उच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला. मात्र, या परीक्षेला विद्यार्थ्यांना बसण्याची सक्ती नाही.
मुंबई : एलएलएमची पहिली सत्र परीक्षा पुढे ढकलण्यास उच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला. मात्र, या परीक्षेला विद्यार्थ्यांना बसण्याची सक्ती नाही. विद्यार्थी परीक्षेला गैरहजर राहिल्यास त्यांना अनुत्तीर्ण न करता, त्यांना दुस-या सत्र परीक्षेबरोबरच पहिल्या सत्र परीक्षेला बसण्याची परवानगी देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने मुंबई विद्यापीठाला सोमवारी दिले. त्यामुळे एलएलएमच्या ६६० विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला. मंगळवारपासून एलएलएमच्या पहिल्या सत्राची परीक्षा सुरू होत आहे.
एलएलएमची पहिली सत्र परीक्षा पुढे ढकलावी, यासाठी काही विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात जनहित व रिट याचिका दाखल केल्या. या याचिकांवरील सुनावणी न्या. भूषण गवई व न्या. बी. पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठापुढे होती. विद्यापीठाने २०१६-२०१७ या शैक्षणिक वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमाचा निकाल लावण्यास विलंब केल्याने, एलएलएमची प्रवेश प्रक्रियाही उशिरा सुरू करावी लागली. यंदा एलएलएममध्ये ६६० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. त्यापैकी ६०० विद्यार्थ्यांना आॅक्टोबर व नोव्हेंबरमध्ये प्रवेश मिळाला, तर ४१ विद्यार्थ्यांना २६ डिसेंबर रोजी प्रवेश देण्यात आला आणि उर्वरित १९ विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया १९ जानेवारी रोजी पूर्ण झाली. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी काही दिवसांतच परीक्षेला बसावे, अशी अपेक्षा करणे योग्य नाही. त्यामुळे २३ जानेवारी रोजी सुरू होणारी पहिल्या सत्राची परीक्षा पुढे ढकलण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली.