LMOTY 2019: मानवतेचा धर्म पाळा, आपला देश नक्की सुधारेल; आप्पासाहेब धर्माधिकारींचा 'गुरूमंत्र'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 11:14 PM2019-02-20T23:14:43+5:302019-02-21T16:39:53+5:30
मी जात-पात, धर्म मानत नाही. माझ्यासाठी मन्युष ही जात आणि मानवता हा धर्म आहे - धर्माधिकारी
मुंबई : देशातील बऱ्याच व्यक्ती जात-पात, धर्म या गोष्टींमध्ये अडकलेली आहेत. त्यामुळेच सध्या देशामध्ये माणूस म्हणून जगणे कठीण झाले आहे. पण प्रत्येकाने आपला धर्म पाळला तर देश सुधारण्यास मदत होईल, असे मत जेष्ठ्य निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी 'लोकमत'च्या 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' या पुरस्कार सोहळ्यात व्यक्त केले. यावेळी धर्माधिकारी यांना समाजभूषण जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.
या कार्यक्रमामध्ये धर्माधिकारी म्हणाले की, " मी जात-पात, धर्म मानत नाही. माझ्यासाठी मन्युष ही जात आणि मानवता हा धर्म आहे. पण देशातील जात आणि धर्मांतील भेदभाव कमी व्हायला हवेत. जर प्रत्येकाने आपला धर्म पाळला तर त्यामध्ये देशाचेच हित आहे. आपल्याला संतांची फार मोठी परंपरा आहे. जर आपल्याला आपण स्वत: कोण आहोत हे जाणायचे असेल तर संताची वचने वाचायला हवीत."
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धर्माधिकारी यांना यावेळी समाजभूषण जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले. पुरस्कार स्वीकारल्यावर धर्माधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शनही केले.
धर्माधिकारी म्हणाले की, " मी कुठला महाराज वैगेरे नाही, मी फक्त चांगले विचार देतो. चांगल्या विचारांतून लोकांचे भले कसे करता येईल, हेच मी पाहत असतो. मी कधीच जाहिरात केली नाही, त्याची मला गरजही नाही. पण शेवटपर्यंत समाजकार्य करत राहणार आणि लोकांकडूनही करवून घेणार."
मन उत्तम असेल तर देशही चांगला घडू शकतो
देशाला घडवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. पण त्यासाठी प्रत्येक व्यक्तीचे मन चांगले असायला हवे. मनामध्ये चांगले विचार असायला हवेत. मनाला स्थिर करण्यासाठी चांगले विचार असणे महत्वाचे आहे. मन उत्तम असेल तर देशही चांगला घडू शकतो. आपण प्रत्येकाने अडचणींवर मात करायला शिकलो तर ते देशाच्या हिताचे असेल," असे धर्माधिकारी यांनी सांगितले.