LMOTY 2019 : महाराष्ट्राचा झेंडा अटकेपार रोवणाऱ्या स्मृती मानधनाचा Sports Person Of The Year पुरस्काराने सन्मान
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 08:40 PM2019-02-20T20:40:54+5:302019-02-21T15:27:10+5:30
LMOTY 2019: महिला क्रिकेटपटू म्हणून गौरविलेल्या महाराष्ट्राच्या स्मृती मानधनाचा 'लोकमत'नं बुधवारी सन्मान केला.
मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) २०१८ ची सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू म्हणून गौरविलेल्या महाराष्ट्राच्या स्मृती मानधनाचा 'लोकमत'नं बुधवारी सन्मान केला. 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यात' तिला Sports Person Of The Year पुरस्कारानं गौरविण्यात आले. स्मृतीनं गेल्या वर्षभरात सातत्यपूर्ण कामगिरी करताना आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटूंमध्ये स्वतःचा दबदबा निर्माण केला. तिच्या बिनधास्त, बेधडक फटकेबाजीसमोर प्रतिस्पर्धी गोलंदाज हतबल होतात. अशा स्मृतीला बुधवारी 'लोकमत'नं गौरविले.
महाराष्ट्राची कन्या स्मृतीला सातत्यपूर्ण कामगिरीचे फळ मिळाले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या वन क्रमवारीत स्मृतीने महिला फलंदाजांमध्ये अव्वल स्थानावर आहे. फोर्ब्सने नुकत्याच जाहीर केलेल्या भारताच्या ' 30 अंडर 30' यादीत स्मृतीने स्थान पटकावले. स्मृतीच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारतीय महिला संघाने न्यूझीलंडमध्ये २४ वर्षांत प्रथमच वन डे मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. भारतीय महिला संघाची भविष्यातील सुपरस्टार म्हणून तिच्याकडे पाहिले जात आहे. अशा या स्मृतीचा लोकमतनं गौरव केला.
या पुरस्कार सोहळ्याला सन्माननीय अतिथी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. फडणवीस यांची ‘लय भारी’ मुलाखत अभिनेते रितेश देशमुख घेणार असून हे या सोहळ्याचे विशेष आकर्षण आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा या समारंभात ‘पॉवर आयकॉन’ पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. उद्धव ठाकरे यांचे खास भाषण हा या समारंभाचा उत्सुकतेचा विषय असणार आहे.
समारंभास विशेष अतिथी म्हणून डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री अप्पासाहेब धर्माधिकारी उपस्थित आहेत. त्यांना यावेळी ‘समाजभूषण जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. याच समारंभात भारत फोर्जचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष बाबासाहेब कल्याणी, जगविख्यात भारतीय शिल्पकार पद्मभूषण राम सुतार, अभिनेत्री दीपिका पदुकोण, चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी, अभिनेते रितेश विलासराव देशमुख, अभिनेते विकी कौशल, इस्त्रायलमध्ये प्रकाशित होणाऱ्या मायबोली या मराठी मासिकाचे संपादक नोह मासिल आणि क्रिकेटर स्मृती मानधना उपस्थित असणार आहेत. यावेळी दीपिका पदुकोण, विकी कौशल आणि रोहित शेट्टी यांच्याशी गप्पांची मैफल रंगणार आहे.