LMOTY 2020: महाराष्ट्रीयन ऑफ द इयर विजेते; 'हे' आहेत या वर्षीचे पुरस्कार विजेते, जाणून घ्या माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 07:54 AM2021-03-25T07:54:54+5:302021-03-25T07:55:10+5:30
देशाच्या उभारणीपासून ते माणसाच्या उभारणीपर्यंतचे काम करणाऱ्या मुलखावेगळ्या व्यक्तिमत्त्वांचा सत्कार करताना ‘लोकमत’ला विशेष आनंद होत आहे
लोकमत - महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’चे हे सातवे पर्व. दरवर्षी दिमाखात साजरा होणारा हा सोहळा या वेळी कोरोनाच्या निर्बंधांमुळे विजेते आणि मान्यवर यांच्यापुरताच मर्यादित करण्यात आला. विविध क्षेत्रांत आपल्या असामान्य कर्तृत्वाने समाजाला दिशा देण्याचे काम ज्या लोकांनी केले, त्यांची या वर्षी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. देशाच्या उभारणीपासून ते माणसाच्या उभारणीपर्यंतचे काम करणाऱ्या मुलखावेगळ्या व्यक्तिमत्त्वांचा सत्कार करताना ‘लोकमत’ला विशेष आनंद होत आहे. हे आहेत या वर्षीचे पुरस्कार विजेते. त्यांनी केलेले कार्य थोडक्यात येथे दिले आहे.
डॉ. श्रीकांत दातार, बाेस्टन (कुलगुरू हार्वर्ड बिझनेस स्कूल)
डॉ. श्रीकांत दातार हे मराठी. मूळ मुंबईचे. १९९६ साली डॉ. दातार जगप्रसिद्ध हार्वर्ड विद्यापीठात रुजू झाले आणि त्यानंतर गेली पंचवीस वर्षे त्यांनी हार्वर्डमध्ये अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. सहकार्य, सर्जनशीलता आणि नेतृत्व यांचा संगम असणारी दूरदृष्टीची माणसे बदलत्या जगात आपला विशेष ठसा उमटवू शकतात. डॉ. श्रीकांत दातार त्याचे मूर्तिमंत उदाहरण आहेत. काळाची पावले ओळखून नवे मिश्र अभ्यासक्रम सुरू करण्याचे त्यांनी दाखवलेले धाडस अनेकांसाठी मार्गदर्शक ठरले.
जाफरबाबा सय्यद, काेल्हापूर (बैतुलमाल समिती)
मानव सेवेतील हे अत्यंत दुर्मीळ उदाहरण आहे. तुम जमिनवालोंपर रहम करो... आस्मानवाला तुमपर रहम करेगा... हे तत्त्व बाळगून ही संस्था काम करत आहे. कोरोना काळात ७५० मृतांवर त्यांनी अंत्यसंस्कार केले. दहन व दफन करतानाचे व्हिडिओ नातेवाइकांना पाठविणे, अस्थी पोहोच करणे, असेही काम करून मृत्यूनंतरच्या भावनाही त्यांनी जपल्या. भुकेलेल्यांना जगविण्याचे काम केले. व्हेंटिलेटर, बेड, सीपीआर व आयजीएम रुग्णालयांस मोफत आणून दिले.
इकबाल सिंह चहल, मुंबई (मुंबई महापालिका आयुक्त)
स्वतः मैदानात उतरून रुग्णालय, हॉटस्पॉट विभागांची पाहणी सुरू केली. त्यांच्या संकल्पनेतून चेस द व्हायरस, मिशन झीरो, फिव्हर क्लिनिक अशा मोहिमा राबविल्या. त्यामुळे मे अखेरीस मुंबईतील परिस्थिती हाताबाहेर जाईल, असे अंदाज व्यक्त केले जात असताना राबविलेल्या उपाययोजनांमुळे कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आला. धारावीतील लढ्याचे कौतुक जागतिकस्तरावर झाले. बाधित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची जबाबदारी पालिकेच्या वॉर रूमवर त्यांनी सोपविली. रुग्णांना खाटा मिळण्यास होणारी अडचण दूर झाली.
डॉक्टर आरती सिंह, अमरावती (पोलीस आयुक्त)
मालेगाव शहरात कोरोनाने दहशत निर्माण केली, त्या काळात साथ आटोक्यात आणण्यासाठी आणि जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी मेहनत करणाऱ्या पोलीस अधिकारी. दिवस-रात्र मालेगाव शहर पिंजून काढणाऱ्या महिला अधिकारी या भागात याआधी झाल्या नाहीत. स्वतः एमबीबीएस डॉक्टर असल्यामुळे त्यांनी जनतेचीच नाही, तर पोलीस दलाचीदेखील काळजी घेतली. घरी स्वतःची दोन छोटी मुलं असताना आपल्या घरी न जाता त्या पोलीस ठाण्यातही प्रसंगी मुक्काम करीत होत्या. त्यांच्या परिश्रमामुळे मालेगावमध्ये साथ आटोक्यात आली.
आस्तिककुमार पांडेय, औरंगाबाद (मनपा आयुक्त)
औरंगाबाद शहराला कोरोनाच्या विळख्यातून बाहेर काढण्याची मोठी जबाबदारी यांच्यावर आली. कोविड १९ टास्कफोर्स, वॉर रूम, हेल्पलाइन, कोरोनाबाधितांचे स्थलांतर, बारकाईने राबविलेली कोरोना तपासणी मोहीम अशा अनेक माध्यमांतून आस्तिककुमार यांनी शहरातील आयसोलेशन बेेडची संख्या अल्पावधीतच शून्यापासून २ हजार आणि नंतर ५ हजारांपर्यंत वाढविली. त्यांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनाखाली औरंगाबादने अल्पावधीतच कोरोना परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.
डॉ. तात्याराव लहाने, मुंबई (संचालक, वैद्यकीय शिक्षण)
कोरोना काळात राज्यात तीन लॅब होत्या, आज ५४६ लॅब सुरू आहेत. १०,८९० डॉक्टर राज्यभरात उपलब्ध करून दिले. २९१७ एमबीबीएस शिकणारे तिसऱ्या वर्षातले डॉक्टर्स कोरोना हॉस्पिटलसाठी उपलब्ध करून दिले. ६००० नर्सेस उपलब्ध करून देण्याचे काम त्यांनी केले. रेमडेसिवीर, फवीपीरावीर, टोसिलिझुमबचे दरकरार करून देशात सगळ्यात कमी किमतीत ही औषधी उपलब्ध करून दिली. आयुष टास्क फोर्स यांच्या अध्यक्षतेखाली तयार केला गेला. त्याद्वारे ९५० आयुष इम्युनिटी सेंटर्स राज्यात उभे केले गेले.
सज्जन जिंदल, मुंबई (अध्यक्ष, जिंदल स्टील वर्क्स)
देशातील दुसऱ्या क्रमांकाची स्टील कंपनी जेएसडब्ल्यू चे अध्यक्ष सज्जन जिंदल सुमारे १४,७०० कोटी रुपयांच्या उद्योग समूहाचे अध्यक्ष आहेत. केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ धोरणावर ठाम विश्वास ठेवणारे सज्जन जिंदल वर्ल्ड स्टील असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि इंडिया स्टील असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. जेएसडब्ल्यू फाउंडेशनच्या माध्यमातून आपण गरिबांना मदत करताना त्यांनी अनेक समाजोपयोगी आणि कल्याणकारी कार्यक्रम राबविले आहेत.
विजय शेखर शर्मा, दिल्ली (अध्यक्ष, वन ९७ कम्युनिकेशन)
पेटीएम, आज भारत देशाच्या कानाकोपऱ्यात पेमेंट सुविधा उपलब्ध करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे आणि या निर्मितीचे श्रेय, वन-९७ कम्युनिकेशन लि.चे अध्यक्ष व एम.डी. विजय शेखर शर्मा यांना जाते. पेटीएमच्या साहाय्याने, २०११ मध्ये डिजिटल पेमेंटच्या जगात प्रवेश केला. २०१६ मध्ये नोटबंदीच्या काळात लोकांना याचा आधार होता. फोर्ब्स मॅगझिनने ३९ वर्षीय विजय शेखर जी यांना देशाचा सगळ्यात तरुण अब्जाधीश घोषित केले. मग, २०१८ मध्ये ई-कॉमर्स कंपनी पेटीएम मॉल सुरू झाली आणि २०१९ मध्ये बँक उदयाला आली.
प्रदीप राठोड, मुंबई (सीईओ, सेलो ग्रुप)
जिद्द, आत्मविश्वास आणि चिकाटीच्या बळावर वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी आपल्या परिवाराच्या व्यवसायात पाऊल ठेवले आणि सेलोला जगभरात पोहोचविले. ह्या मोठ्या स्वप्नाची सुरुवात मुंबईमध्ये ७ मशिन्स आणि ६० कामगारांबरोबर एका छोट्या कारखान्यातून झाली. थर्मोवेअर उत्पादनांच्या क्षेत्रात सेलोची उत्पादने त्यांच्या उत्तम गुणवत्तेमुळे बाजारात प्रभाव पाडू शकली. घराघरांत आपले उत्पादन पोहोचविण्यात प्रदीप राठोड यांचा सिंहाचा वाटा आहे.
युवराज ढमाले, पुणे (एमडी, युवराज ढमाले कॉर्प)
दुष्काळग्रस्त भागात यांनी जनावरांच्या छावण्यांना पशुखाद्य पुरविले. १८ छावण्यांमध्ये राहणाऱ्या ३४०० हून अधिक शेतकऱ्यांची जेवणाची व्यवस्था त्यांनी केली होती. कोरोनात गोरगरिबांना खाण्याची भ्रांत होती. या वेळी ढमाले यांनी शेकडो कुटुंबांना अन्नधान्याचे वाटप केले. कोरोनायोद्ध्यांना बळ देण्यासाठी मास्क, सॅनिटायझरपासून वस्तूंचा पुरवठा केला. वैद्यकीय मदतीअभावी गोरगरिबांना वंचित राहावे लागू नये यासाठी युवराज ढमाले सतत मदत करीत असतात. अनेक कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या उपचाराचा खर्च ते नेहमी उचलत असतात.
वंदना सुनील अवसरमल, मुंबई (मृत्यू नोंदणी कारकून)
मुलुंडच्या टाटा स्मशानभूमीत मृत्यू नोंदणी कारकून म्हणून काम करताना कोरोना काळात सतत मृतदेह येत राहिले. अनेकदा घरीही जाता आले नाही. कोरोनाची आणि आजूबाजूला पसरलेल्या भयाण भीतीवर मात करीत स्मशानभूमीत कोरोना काळात सेवा बजावली. येणाऱ्या मृतदेहांची नोंदणी करणे, त्यांच्या अंत्यसंस्काराचे काम पार पाडणे ही कामे जबाबदारीने त्यांनी पार पाडली. स्वतःवरचा दहावी नापास असा शिक्का पुसून टाकत स्वतःच्या हिमतीवर नोकरी मिळवली आणि हे मुलखावेगळे काम स्वीकारले.
डॉ. रोहिदास बोरसे, पुणे (ससून हॉस्पिटल)
सेनापतीच्या भूमिकेत जबाबदारी पेलायला सुरुवात केली. अत्यवस्थ रुग्णांची काळजी घेण्यापासून नातेवाइकांना परिस्थितीची कल्पना देईपर्यंत प्रत्येक जबाबदारी त्यांनी सांभाळली. गेले ३५०-६० दिवस ते अहोरात्र रुग्णांच्या उपचारांसाठी झटत आहेत. कोरोनाचा उद्रेक पुन्हा वाढत असताना डॉक्टर, परिचारिका, जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी यांचे प्रशिक्षण डॉ. बोरसे यांच्या नेतृत्वाखाली पार पडत आहे. मार्च २०२० मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मधून ससून रुग्णालयातील डॉ. रोहिदास बोरसे यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची विचारपूस केली होती.
अजिंक्य रहाणे, मुंबई (क्रिकेटर)
मेहनत, आत्मविश्वास आणि महत्त्वाकांक्षेच्या जोरावर भारतीय संघामध्ये आपले स्थान प्रस्थापित केले. जेव्हा जेव्हा संघाला गरज असते तेव्हा तेव्हा संघाच्या मदतीला धावून येणारा एक अवलिया खेळाडू. अनेक मालिका अजिंक्यनी आपल्या फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाने गाजवल्या. अत्यंत धूर्त आणि आक्रमक कप्तान. काही महिन्यांपूर्वीच ऑस्ट्रेलियात झालेल्या कसोटी मालिकेत संघाचे मनोबल खचलेले असताना संघाला त्यातून योग्य मार्ग दाखवून अशक्य असा वाटणारा मालिका विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली.
एकनाथ शिंदे, ठाणे (नगरविकास मंत्री)
अपार कष्ट आणि लोकसेवेची प्रामाणिक कळकळ. कोरोनाविरोधातील लढाईतही त्यांचे हेच गुण प्रकर्षाने दिसून आले. दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये शिरून तेथील लोकांशी संवाद साधणं असेल, तिथे निर्जंतुकीकरणासाठी करायची फवारणी असेल किंवा पीपीई किट घालून थेट कोविड वॉर्डात शिरून कोरोना रुग्णांशी संवाद साधून त्यांना धीर देणं असेल, ते आघाडीवर राहून लढले. विक्रमी वेळेत जम्बो कोविड हॉस्पिटल्स त्यांनी उभी केली. सरकारी व्यवस्थाही किती स्वच्छ, नेटकी, अद्ययावत आणि कार्यक्षम असू शकते, हे त्यांनी दाखवून दिलं.
अनिल देशमुख, नागपूर (गृहमंत्री महाराष्ट्र राज्य)
एखाद्या तरुणालाही लाजवेल अशा उत्साहाने राज्याला गवसणी घालत कोरोनायोद्ध्या पोलीस दलाचे मनोधैर्य वाढवले. सतत फिरस्तीवर असलेले गृहमंत्री महाराष्ट्राने पाहिले. दोन जिल्ह्यांच्या सीमेवर ते हमखास थांबले. शिपाई ते अधिकाऱ्यांचा वाढदिवस थेट चौकीत साजरा केला. राज्यात ३४१ पोलिसांचा कोरोनाने मृत्यू झाल्यावर त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत दिली. ते आणि त्यांच्या पत्नी आरती देशमुख यांनी अक्षरश: शेकडो पोलिसांना व्यक्तिश: फोन केले. शक्ती कायदा अंमलात येण्याच्या टप्प्यात. राज्य पोलिसात १२,५३८ पदे भरण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.
आ. नीलेश लंके, पारनेर - अहमदनगर
लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवसापासून नगर-पुणे महामार्गावर सुपा येथे ६८ दिवस अन्नछत्र चालवले. हजारो परप्रांतीय मजुरांची भूक भागवली. एवढेच नव्हे, अनवाणी चालणाऱ्या मजुरांच्या पायात चपलांचे जोड घातले. तालुक्यातील गरीब कुटुंबांना ९५ लाखांचा किराणा वाटप केला. जिल्हा परिषद शाळांसाठी ‘ऑनलाइन शाळा’ हे सॉफ्टवेअर विकसित केले. १ हजार बेडचे कोविड सेंटरही उभारले. जेव्हा परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावाकडे पोहोचविण्याची परवानगी मिळाली तेव्हा लंके यांनी २०० वाहनांतून या कामगारांना सुखरूप घरी पोहोचविले.
राजाराम चौधरी, जुन्नर, पुणे (प्रगतिशील शेतकरी)
महाराष्ट्रातील जुन्नर तहसील येथील एक छोटे शेतकरी. त्यांनी फुलांची लागवड करण्यास सुरुवात केली ज्याला ओपन फील्ड ॲग्रीकल्चर म्हणतात. केवळ २.५ एकर जमीन ज्यावर ते विद्युत फुले तयार करतात. आज महाराष्ट्रातील ४ हजारांहून अधिक शेतकरी फुलांच्या लागवडीसाठी त्यांच्याकडून सल्ला घेतात. फक्त १२ गुंठे जमिनीत ४२०० किलो विद्युत फुलांचे उत्पादन केले. राजाराम चौधरी हे ‘समृद्धी कृषी’ पुरस्कार आणि ‘डॉ. पंजाबराव देशमुख प्रेरणा’ पुरस्कारांचे विजेते आहेत.
डॉ. सुधाकर शिंदे, मुंबई (आयुक्त, जन आरोग्य योजना)
कोरोना रुग्णांना खाजगी इस्पितळात बेड मिळत नव्हते, त्या काळात खाजगी हॉस्पिटलला बेड उपलब्ध करून देण्याची सक्ती करणारा आदेश काढला. चाचण्यांचे दर ४५०० रुपयांवरून ८९० रुपयांपर्यंत आणले. मास्क, सॅनिटायझर यांच्या किमती निश्चित करण्यासाठी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने निर्णय घेतले. मास्कचे दर १५० रुपयांवरून १९ रुपयांपर्यंत खाली आणले. रुग्णवाहिकांचे दर निश्चित केल्यामुळे माफक दरात रुग्णवाहिका उपलब्ध होऊ लागल्या. जाणीवपूर्वक त्यांनी केलेले काम समाजसेवेचा वस्तुपाठच.
सोनू सूद, मुंबई (अभिनेता, सोशल वर्कर)
देशभरातून महाराष्ट्रात पोटापाण्यासाठी आलेल्या गोरगरीब मजुरांना आपापल्या गावात जाण्याची कोणतीही सोय नव्हती त्या वेळी रस्त्यावर उतरून सोनू सूद आणि त्याच्या टीमने हजारो लोकांना गावी पाठविण्याची व्यवस्था केली. त्यांच्या जेवणाची, खाण्यापिण्याची व्यवस्था केली. कजाकिस्तानमध्ये अडकलेल्या पंधराशे भारतीय विद्यार्थ्यांना स्पेशल विमानाने त्यांनी वाराणसीला आणले. मास्कोमध्ये अडकलेल्या शंभर विद्यार्थ्यांना तामिळनाडूला आणून सोडले. शासनाच्या कुठल्याही मदतीशिवाय गावांमध्ये रस्ते तयार केले. नोकऱ्या गमावलेल्या कामगारांसाठी प्रवासी रोजगार ॲप सुरू केले.
अविनाश अरुण, पुणे (दिग्दर्शक)
अनुष्का शर्मा निर्मित ‘पाताललोक’ या वेबसीरिजचे दिग्दर्शन ही अविनाशच्या ओटीटी कारकिर्दीची सुरुवात झाली तीच धमाकेदार. पाताललोकमुळे अविनाशचे नाव ओटीटी इंडस्ट्रीच्या वाटचालीमधील एक मैलाचा दगड ठरले. पाताललोक हा एक राजकीय पट. अशा एका पोलीस इन्स्पेक्टरचा ज्याला एक सुवर्णसंधी मिळते एक महत्त्वाची केस सोडवण्याची जी सतत माध्यमांच्या नजरेत आहे. अविनाशनी यात जो रंग भरला आहे त्याला तोड नाही. ‘किल्ला’ हा अविनाशचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपट आहे.
ओम राऊत, मुंबई (चित्रपट दिग्दर्शक)
तानाजी मालुसरे हे नाव माहीत नसलेला मराठी माणूस शोधून सापडणार नाही. तानाजीच्या पराक्रमाला जगासमोर आणण्याचे काम केले ओम राऊत यांनी. अजय देवगणच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३६० करोडहून अधिक कमाई केली. अजयबरोबर काजोल, सैफ अली खान अशी तगडी कास्ट, भव्य सेट्स आणि नेत्रदीपक चित्रीकरण अशा या चित्रपटात मोलाचा वाटा होता एका मराठी सरदाराचा, ओम राऊत त्यांचे नाव. बालकलाकार म्हणून अनेक नाटके आणि जाहिरातींमध्ये काम केल्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण
केले.
डाॅ. अलका पाटणकर, नागपूर (मेयो इस्पितळ)
देवाला कोणीही पाहिले नाही, पण त्याची अनेक रूपे आपल्याला ह्या दुनियेत पाहायला मिळतात. याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे हल्लीच डॉ. पाटणकर यांनी एका अत्यंत कठीण अशा सर्जरीमार्फत गर्भातील बाळाला रक्ताचा पुरवठा करून जीवनदान देण्याचे काम केले आहे. रुग्णांची मानसिकता अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आणि त्यांच्याशी उत्तम प्रकारे संवाद साधण्यासाठी मानसशास्त्राची पदवी घेतली आहे. जन्मापूर्वीचे रोग निदान तंत्र यामध्ये आयसीएमआर मुंबईमधून विशेष शिक्षणही घेतले आहे. आरोग्य सेवेमध्ये त्यांचे योगदान अविरत चालू आहे.
अमोल हंकारे गुरुजी, सांगली (प्राथमिक शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खोतवस्ती, तालुका कवठेमहांकाळ, जिल्हा सांगली अशा अत्यंत ग्रामीण भागातून पुढे आलेल्या हंकारे गुरुजींनी मुलांकरिता छोट्या वर्कशीट तयार केल्या आणि घरोघरी जाऊन मुलांना वाटप केल्या. केंद्र सरकारने हंकारे गुरुजींच्या सहा खेळांची नॅशनल टॉय कॉनक्लेव्हमध्ये निवड केली आहे. असा मान मिळवणारे ते महाराष्ट्रातील एकमेव शिक्षक आहेत. नवोदय, स्कॉलरशिप परीक्षेच्या तयारीसाठी त्यांनी बनविलेले ॲप दीड लाखाहून अधिक मुले वापरत आहेत. भारतातील १७ हजार शिक्षकांनी त्यांच्या ऑनलाइन मार्गदर्शन सत्राचा लाभ घेतला.
डॉ. सिद्धेश्वर बिराजदार, अंबाजोगाई(स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय महाविद्यालय)
ग्रामीण भागात कोरोनाग्रस्ताचे नातेवाईकही रुग्णांच्या जवळ जायला तयार नसायचे. त्या काळात, डॉक्टरांनी झपाटल्यासारखे काम केले. रुग्णांचे नातेवाईकही तेच बनले. डायबेटीस आणि रक्तदाब असताना त्यांना कोरोनाची बाधा झाली. रुग्णांना शासकीय इस्पितळाविषयी विश्वास निर्माण व्हावा म्हणून ते स्वतः शासकीय इस्पितळात दाखल झाले. रुग्णांना दिलासा देत स्वतःवर उपचार करीत राहिले. पंचक्रोशीत ‘कोरोनावर मात करणारे देव’ अशी डॉ. सिद्धेश्वर बिराजदार यांची प्रतिमा झाली आहे.