LMOTY 2022: शरद पवार यांच्यानंतर फडणवीसच..! एकनाथ शिंदेंसमोर असे का म्हणाले नाना पाटेकर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 07:39 AM2022-10-14T07:39:01+5:302022-10-14T07:39:43+5:30
Lokmat Maharashtrian of the year awards 2022: एकनाथ शिंदेंनी खूप वर्षांपासून ओळखतो. ज्यावेळी ते आमदार होते, मीसुद्धा आमदार होतो. विरोधी पक्षात आम्ही एकत्रच काम केलेलं आहे. पुन्हा सरकारमध्ये आलो त्यावेळी मंत्री म्हणून काम केलं... असे उत्तर देणे सुरू केले
लोकमत मीडियाचे चेअरमन विजय दर्डा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘तुम्ही देवेंद्र फडणवीस यांना किती वर्षांपासून ओळखता?’ असा सवाल केला. त्यावर शिंदे यांनी, खूप वर्षांपासून ओळखतो. ज्यावेळी ते आमदार होते, मीसुद्धा आमदार होतो. विरोधी पक्षात आम्ही एकत्रच काम केलेलं आहे. पुन्हा सरकारमध्ये आलो त्यावेळी मंत्री म्हणून काम केलं... असे उत्तर देणे सुरू केले, तेव्हा हळूच विजय दर्डा म्हणाले, ‘हा प्रश्न यासाठी विचारला की, देवेंद्र फडणवीस यांना ओळखताच येत नाही. त्यांच्या मनात काय आहे, त्यांना काय हवंय, हे त्यांचा चेहरा पाहूनही लक्षात येत नाही. त्याबरोबर नाना पाटेकर विजय दर्डा यांच्याकडे पाहून म्हणाले, असं शरदरावांबद्दल बोलायचे पूर्वी लोक... आणि सभागृहात हंशा पिकला.
मुंबईच्या फिल्मसिटीबद्दल फडणवीस म्हणाले...
विजय दर्डा : तुम्ही मुख्यमंत्री असताना सांगितले होते, की दिवसेंदिवस बॉलीवूड हे तांत्रिक अंगाने हॉलीवूडपेक्षा सशक्त होत आहे. पण मुंबईचे वर्चस्व कमी होत आहे. वेगवेगळ्या राज्यांतील लोक चित्रीकरणाची मागणी करीत आहे. त्यांना सूट दिली जात आहे. सुविधा दिल्या जात आहे. मुंबईमध्ये हॉलीवूडपेक्षाही आपले बॉलीवूड सक्षम कसे होईल?
फडणवीस : विद्यापीठे अनेक झाली. पण ऑक्सफर्ड आणि केंब्रिज तशाच आहेत. त्यांना कोणीही संपवू शकले नाही. मुुंबई ही नॅचरल इको सिस्टीम आहे. मुंबईत नॅचरल टॅलेंट आहे. काहीवेळेसाठी तुम्ही एक वातावरण तयार करू शकता, की कधी दक्षिणेत तर कधी उत्तर राज्यात. पण मुंबईला कोणी प्रतिस्पर्धी नाही. आम्ही सत्तेवर आल्यानंतर एक सिंगल विंडो तयार केली आहे. कोणत्याही प्रकारच्या चित्रीकरणाच्या परवानग्यांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जायची गरज नाही. सरकार बदलल्यानंतर ही योजना बंद झाली. ही योजना पुन्हा सुरू करणार आहोत. इथे फिल्म इंडस्ट्रीजची एक इको सिस्टीम आहे. तशाच पध्दतीने व्यावसायिक दृष्टिकोन आणावा लागेल. चित्रीकरणाच्या परवानग्यांसाठी आम्हाला पोलीस ठाण्यांची परवानगी घेणे, चित्रीकरणाच्या ठिकाणी काही गुंड लोकांना त्रास देणार असतील तर त्या स्थितीत फायदा होणार आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आम्ही काम करीत आहोत. आमच्या फिल्मसिटीमध्ये जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञान आणण्याचा आमचा मानस आहे.