LMOTY 2022: असह्य झालं, राजकीय करिअर धोक्यात आलं, अन् सहन करण्याची मर्यादाही संपली...; शिंदेंच्या भावनांना वाट मोकळी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 06:30 AM2022-10-13T06:30:49+5:302022-10-13T06:31:58+5:30
Lokmat Maharashtrian of the year awards 2022: ‘लोकमत’च्या महामुलाखतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भावनांना वाट मोकळी केली
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सन २०१९ ला मिळालेला जनादेश डावलून आम्ही चूक केली. संधी अनेक वेळा आली होती. पण दुदैवाने ती आम्ही घेतली नाही. जेव्हा सगळेच असह्य झाले, पुढचे राजकीय
करिअर धोक्यात आले, तेव्हा हा निर्णय घेतला. शेवटी काही गोष्टी सहन करण्याची मर्यादा असते, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्याच्या महामुलाखतीत आपल्या भावनांना वाट करून दिली.
मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महामुलाखत प्रख्यात अभिनेते नाना पाटेकर यांनी घेतली. या वेळी लोकमत मीडियाचे चेअरमन विजय दर्डा देखील उपस्थित होते. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांतून वेगळी उत्तरे समोर आली.
ज्या वेळी अनैसर्गिक गोष्टी घडतात त्या मनाला न पटणाऱ्या असतात. मी बाळासाहेबांचा कार्यकर्ता आहे. पुढे काय होईल मला माहिती नाही. पण आता लढायचे आहे. लढून शहीद झालो तरी चालेल, पण लढाई लढायचीच, असा निर्णय घेऊन मी मोठे काम केले. आम्ही पक्षासाठी घाम गाळला. घरादाराची पर्वा केली नाही. मात्र, पक्षाचे अहित होत आहे, हे लक्षात आल्यानंतर पाच वेळा विनंती केली. जे सुरू आहे ते दुरुस्त करा, असे सांगितले. मात्र, ऐकायचेच नाही, असे त्यांनी ठरवले होते. आम्ही काही फार आनंदाने हा निर्णय घेतलेला नाही. भाजप आणि शिवसेनेला जनतेने कौल दिला होता. तो डावलून सरकार बनवण्याचा अट्टहास केला गेला. झालेली चूक आम्ही तीन महिन्यांपूर्वी दुरुस्त केली आहे.
कोविड असल्यामुळे चूक दुरुस्त व्हायला वेळ लागला. काही वेळ त्यांना समजावण्यात गेला. पण आम्हाला यश आले नाही. पण आम्ही लोकांच्या मतांचा आदरच केला आहे, असे सांगत शिंदे यांनी आपले मन मोकळे केले.
आमची किंमत तुमच्या भरवशावर
मुलाखतीच्या सुरुवातीलाच नाना पाटेकर यांनी मतदार म्हणून आम्हाला किंमत आहे का? एकदा मत दिल्यानंतर पाच वर्षें आम्ही खिजगणतीतही नसतो. आम्ही तुम्हाला मत दिले आहे. प्रत्येकाने कोणाला तरी मत दिले असेल. तुम्ही जर काही केले नाही तर आम्ही काय करायचे? पाच वर्षानी आम्ही काय करायचे ते करू पण त्याच्या आधी आम्ही काय करायचे? याचे उत्तर तुमच्यापैकी कोणीही द्या, असा सवाल केला. तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, आमची किंमत तुमच्या भरवशावर आहे. तुमची किंमत कमी झाली तर आमची कशी राहील? तुमच्या मनातील आमची प्रतिमा खराब झाली तर तुम्ही आम्हाला कसे जवळ कराल, असे सांगितले.
पाच हजार बोगस शपथपत्रे मिळाली
बाळासाहेबांची शिवसेना म्हणून आम्हाला नाव मिळाले आहे. शिंदे-बिंदे जाऊ द्या, बाळासाहेब महत्वाचे आहेत. ते निवडणूक आयोगाने मान्य केले आहे. मेरीटनुसार धनुष्यबाण आम्हालाच मिळाला पाहिजे. असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मी कालपासून बघतोय आमच्यावर अन्याय झाला म्हणून कोणी गळे काढत आहे. मात्र, निवडणूक आयोगाने चिन्ह गोठवले त्याला तेच जबाबदार आहेत. निवडणूक आयोगाने वारंवार कागदपत्रे सादर करण्याची संधी दिली होती. चार वेळा वेळही वाढवून दिली. आताच मला समजले की, त्यांना पाच हजार बोगस शपथपत्रे मिळाली. पोलिसांनी ती ताब्यात घेतली आहेत, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.
जब मैं कमिटमेंट करता हूँ तो...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वेळी जोरदार फटकेबाजी केली. एकदा मी जर कोणाला विश्वासाने शब्द दिला तर मी तो पूर्ण करतो. असे सांगून शिंदे यांनी सलमान स्टाइलमध्ये ‘जब मैं कमिटमेंट करता हूँ तो मैं खुद की भी नहीं सुनता...’ असे सांगताच सभागृहात हंशा पिकला.
समोर कोणती कंपनी आली...
आता समोर कोणती कंपनी आली आहे, माहिती नाही. अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा नामोल्लेखही न करता मुख्यमंत्री शिंदे यांनी टोले लगावले.
सरकार फेसबुकवर बनत नाही
सरकार फेसबुक लाइव्हवर बनवता येत नाही. त्यासाठी एकत्र यावे लागते आणि आम्ही तसे एकत्र आलाे व फिजिकल सरकार बनवले, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चिमटा काढला. उद्धव ठाकरे सातत्याने फेसबुकवर लाइव्हवर यायचे. मंत्रालयातही ते फारसे आले नाहीत. त्याचा संदर्भ या बोलण्यामागे होता. त्यामुळे सभागृहात हंशा पिकला नाही तर नवल.