LMOTY 2022: ‘इनोव्हेटर इन ॲग्रीकल्चर’ मिथिलेश देसाई ठरले 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराचे मानकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 09:21 PM2022-10-11T21:21:47+5:302022-10-11T21:24:35+5:30
Lokmat Maharashtrian of the Year Awards 2022: कृषी क्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी लांजा (रत्नागिरी) येथील मिथिलेश देसाईंचा गौरव
Lokmat Maharashtrian of the Year Awards 2022: महाराष्ट्राच्या जडणघडणीत आपल्या कार्यानं मोलाचा हातभार लावणाऱ्या सोन्यासारख्या माणसांचा कृतज्ञ सन्मान म्हणजे, 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार. लोकसेवा-समाजसेवा, शिक्षण, प्रशासन, राजकारण, वैद्यकीय, उद्योग, क्रीडा, कृषी, सीएसआर या क्षेत्रांमध्ये लक्षवेधी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना दरवर्षी या पुरस्कारानं गौरवण्यात येतं. यंदा इनोव्हेटर इन ॲग्रीकल्चर विभागात लांजा रत्नागिरी येथील मिथिलेश देसाई (Mithilesh Desai) यांना 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' या पुरस्कारानं एडीएम ग्रुपचे अमन मेहतानी यांना गौरवण्यात आलं.
LIVE: रत्नागिरी जिल्ह्यातील तरुण शेतकरी मिथिलेश देसाई याला कृषी श्रेणीतील 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार प्रदान करण्यात आला.#LokmatMaharashtrianOfTheYear#LMOTY2022#MahaMulakatpic.twitter.com/lwvVjebG94
— Lokmat (@lokmat) October 11, 2022
कोकण म्हणजे विस्तीर्ण समुद्र किनारा आणि आंबा, कांजू, नारळी-पोफळीच्या बागा. कोकणातला माणूस बाहेरून फणसासारखा ओबडधोबड वाटत असला तरी आतून गरासारखा गोड असतो, असे म्हटले जाते. मात्र, फणसाची व्यावसायिक शेती कोकणात होत नाही. घराजवळ झाडे असतात, तेवढीच. फणसाला शेतीचं रूप देण्याचं आणि त्याच्या विक्रीतून आर्थिक समृद्धी आणण्याचं काम राहुरी कृषी विद्यापीठातून बी. टेक. (ॲग्रिकल्चर) झालेले इंजिनिअर मिथिलेश हरिश्चंद्र देसाई करीत आहेत. देसाई कुटुंब व्यावसायिक तत्त्वावर महाराष्ट्रात फणस लागवड करणारे पाहिले शेतकरी कुटुंब आहे.
मिथिलेश यांचे वडील हरिश्चंद्र देसाई यांना महाराष्ट्राचे फणस किंग म्हणून ओळखले जाते. मिथिलेश यांनी जगातल्या १३० फणसाच्या व्हरायटींपैकी ८६ व्हरायटींची लागवड केली आहे. थेट अख्खा फणस न विकता त्याचा गर करून विक्री. एका फणसाचे १५०० ते २००० रुपये मूल्य मिळते. महाराष्ट्रातील एकमेव शासनमान्य फणस रोपवाटिका त्यांनी विकसित केली असून महाराष्ट्र, तसेच देशभर फणसाच्या जाती व झाडे येथून पाठविली जातात. ते मॉरिशसमध्ये फणसाची रोपे पाठवत आहेत. जकफ्रूट ऑफ गोवा यासाठी त्यांचे गोवा सरकारसह याच पद्धतीचे काम त्रिपुरा आणि मेघालय सरकारसोबत सुरू आहे. कोकणातील सर्वांत मोठी फार्मर प्रोड्युसर कंपनी (एफपीसी) आहे. एपीसीची फणसावर प्रक्रिया करण्यासाठी ५ कोटींच्या स्मार्ट प्रकल्पासाठी निवड झाली आहे. १० महिन्यांपूर्वी फणसाची १ टन हिरवी पाने त्यांनी जर्मनीला निर्यात केली. पानांचा कर्करोग उपचारासाठी होऊ शकतो का, याची तेथील संशोधन प्रकल्पात चाचपणी सुरू आहे. मधुमेहाच्या (टाइप टू) उपचारासाठीही फणसाचा उपयोग होतो. कच्चे फणस निर्यातीला त्यासाठी मोठा वाव असल्याचे मिथिलेश मानतात. २०१२ मध्ये देसाई कुटुंबाने २५० फणसाची झाडे लावली. मिथिलेश यांच्या प्रयत्नाने आता १८ एकर क्षेत्रावर १५०० झाडे आहेत. राज्यात मोठ्या क्षेत्रावर फणसाची लागवड करण्यात आली आहे.