LMOTY 2023: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सध्या कोणाबरोबर आहेत तेच कळत नाहीय; राज यांची अमृता फडणवीसांनाच 'गुगली'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 08:29 PM2023-04-26T20:29:27+5:302023-04-26T20:30:26+5:30
Lokmat Maharashtrian of the Year Awards 2023: अमृता फडणवीस यांनी राज यांना टाळी आणि डोळे मारण्यावरून प्रश्न विचारला. पुछता है महाराष्ट्र तुमचा काय प्लॅन आहे, असा प्रश्न अमृता यांनी विचारला. यावर राज यांच्या उत्तराने राज यांच्या पत्नी देखील खदखदून हसल्या.
आजच्या 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार' सोहळ्यात राज ठाकरेंची मुलाखत अफलातून ठरली आहे. राज यांची राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे आणि अमृता फडणवीस यांनी मुलाखत घेतली. यावेळी अमृता यांच्या शिवसेना-भाजपा-राजकारण या प्रश्नांवर राज यांनी 'गुगली'लाच गुगली टाकत उत्तरे दिली.
महाराष्ट्राच्या जडणघडणीत आपल्या कार्यानं मोलाचा हातभार लावणाऱ्या सोन्यासारख्या माणसांचा सन्मान करणारा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' हा पुरस्कार सोहळा मुंबईत वरळी येथील एनएससीआय डोम येथे पार पडला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत झाली. राज यांच्या उत्तरांनी अवघे पाहुणे हसून हसून लोटपोट झाले.
अमृता फडणवीस यांनी राज यांना टाळी आणि डोळे मारण्यावरून प्रश्न विचारला. आजकाल राजकारणात टाळी देणे, डोळे मारणे चालू आहे. उदा. राहुल गांधींनी मोदींना मिठी मारली आणि डोळा मारला, अजित पवारांनी उद्धव ठाकरेंकडे माईक दिला आणि डोळा मारला, पुछता है महाराष्ट्र तुमचा काय प्लॅन आहे, असा प्रश्न अमृता यांनी विचारला.
यावर राज ठाकरेंनी ''डोळे मारायचा?'' असा सवाल करताच सोहळ्यात एकच हशा पिकला. यावर हो आणि टाळी द्यायचा, दोन्ही असे अमृता फडणवीस म्हणाल्या.
यावर राज ठाकरे यांनी काही सेकंद विचार करून अत्यंत चपखल उत्तर दिले. हे काय आहे, ज्या वयातल्या गोष्टी त्या वयात करायच्या असतात, त्यांच्या राहून गेल्या असतील कदाचित, असे उत्तर राज यांनी दिले आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.
अमृता यांनी मी राजकारणात सक्रीय नाही, न्यूज चॅनलवरून कळते की तुम्ही कधी राष्ट्रवादीच्या जवळ दिसता, कधी बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत दिसता तर कधी भाजपाला टाळी देता, तर हे कभी हा, कभी ना आता खूप पाहिलेय आता हे हम साथ साथ है हे केव्हा आणि कोणाबरोबर करणार, असा सवाल विचारला.
यावर राज यांनी अमृता यांचा मुलाखतीच्या आधीचा मी देवेंद्र फडणवीसांची पत्नी म्हणून बोलणार नाहीयचा संदर्भ घेतला. तुम्ही देवेंद्रजींच्या पत्नी म्हणून बोलत नाही आहातच. त्यामुळे बोलुनच टाकतो. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सध्या कोणाबरोबर आहेत तेच कळत नाहीय, ते पहाटे कुठेतरी गाडी घेऊन जातात, तुम्हाला पत्ताच नसतो कित्येकदा. कधीतरी ते शिंदेंसोबत दिसतात, कधीतरी अजित पवारांचा पहाटे चेहरा उतरलेला दिसतो. कोणाला भेटणं, बोलणं हे पत्रकारांना सध्या बातमी झाली आहे. राजकारणातला मोकळेपणा मीडियाने घालवला आहे. कोणी कोणाला भेटले, बोलले यामुळे युत्या आणि आघाड्या होत नसतात. जोवर मूर्त स्वरुप येत नाही तोवर त्याला अर्थ नाही, असे राज ठाकरेंनी स्पष्ट केले.