LMOTY 2023: एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, अजित पवार यांना राज ठाकरेंनी काय सल्ले दिले; अमृतांनी देवेंद्रंबाबतही केली तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 09:09 PM2023-04-26T21:09:05+5:302023-04-26T21:10:12+5:30
Lokmat Maharashtrian of the Year Awards 2023: देवेंद्र फडणवीसांबाबतच्या प्रश्नावर मला तुमच्या घरच्या प्रश्नांमध्ये नका आणू... असे राज यांनी म्हटले...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत जबरदस्त रंगली आहे. 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार' सोहळ्यात राज यांची राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे आणि अमृता फडणवीस यांनी मुलाखत घेतली. यावेळी अमृता यांनी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, अजित पवार आणि आदित्य ठाकरेंना काय सल्ला द्याल असा प्रश्न केला. यानंतर फडणवीसांबद्दलचा एक तक्रारवजा सवालही केला.
एकनाथ शिंदेंना काय सल्ला द्याल असे अमृता यांनी विचारले, तेव्हा राज यांनी त्यांना जपून रहा असा सल्ला दिला. देवेंद्र फडणवीस यांना राज यांनी वरती संबंध नीट ठेवा असा सल्ला दिला. अजित पवारांना पाच तारखेच्या सभेत सविस्तर बोलायचेय. बाहेर जेवढे लक्ष देतायत त्यापेक्षा जास्त काकांवर लक्ष ठेवा, असा सल्ला राज यांनी दिला.
उद्धव ठाकरेंना काय सल्ला द्याल असे विचारताच राज यांनी उद्धव ठाकरेंना काय सांगणार मी, स्वयंभू आहेत ते, असे म्हटले. आदित्य ठाकरेंनाही तेच ते असे म्हटले. यानंतर अमृता यांनी राज ठाकरेंना देवेंद्र फडणवीसांना दिलेल्या सल्ल्यावरून छेडले.
तुम्ही म्हणालात की देवेंद्र यांना इथे लक्ष देतात तसे वर पण लक्ष दिले पाहिजे. मला वाटते त्यांनी थोडे घरीपण लक्ष दिले पाहिजे. माझा एक प्रश्न आहे तुम्हाला... यावर राज ठाकरेंनी थांबवत मला तुमच्या घरच्या प्रश्नांमध्ये नका आणू, मला जेव्हा तुम्ही माझी मुलाखत घेताय नाव समोर आले तेव्हा... असे म्हटले. यावर अमृता फडणवीस काही थांबल्या नाहीत.
LMOTY 2023: तुम्ही बसल्या जागी मीडियाला कामाला लावता; मीडिया हँडलिंग कसं जमतं? राज ठाकरे म्हणाले...
तरीही मी तुम्हाला विचारेन, कारण ते दरवेळेस म्हणतात. ही जी परिस्थिती आहे घराची ती प्रत्येक बिझी राजकारण्याच्या घरात असते. खासगी आयुष्यात तुमच्याकडे फिरायला जाण्यासाठी वेळ असतो का, एकमेकांना देण्यासाठी वेळ असतो का, असा सवाल केला. यावर राज यांनी देवेंद्र हे २०१४ पासून सत्तेत आहेत. मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे खूप जबाबदारी असते. आता उपमुख्यमंत्री आहेत. यामुळे ते तुम्हाला वेळ देऊ शकत नाहीत. हे गेल्या सात-आठ वर्षांत ते वेळ देऊ शकले नसतील. परंतू त्याच्याआधी त्यांनी तुम्हाला वेळ दिलेला आहे, तुमचे फोटो पाहिलेत मी. मला भेटले तर मी बोलेन त्यांना. मी नक्कीच त्यांना काही ठिकाणे सुचवेन, असे राज ठाकरे म्हणाले.