अपंगत्वाशी लढले, संकटांशी भिडले, 'नोकरी देणारे' झाले! जयसिंग चव्हाण यांचा 'लोकमत'च्या विशेष पुरस्काराने गौरव
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 07:11 PM2024-02-15T19:11:49+5:302024-02-15T19:12:27+5:30
Lokmat Maharashtrian of the Year Awards 2024: महाराष्ट्राच्या जडणघडणीत आपल्या कार्यानं मोलाचा हातभार लावणाऱ्या सोन्यासारख्या माणसांचा सन्मान करणारा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' हा पुरस्कार सोहळा गुरुवारी मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे पार पडला.
लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळा म्हणजे महाराष्ट्राच्या हिताचा ध्यास घेतलेल्या, या मातीशी एकरूप झालेल्या आणि महाराष्ट्राची पताका देश-विदेशात फडकवणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान सोहळा. लोकसेवा-समाजसेवा, कृषी, शिक्षण, प्रशासन, वैद्यकीय, उद्योग, राजकारण या क्षेत्रांमध्ये भरीव कार्य करणाऱ्या गुणी-ज्ञानी-अनुभवींचा दरवर्षी हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. या सोहळ्यात, प्रवाहाच्या विरुद्ध पोहून दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर असाध्य ते साध्य करून दाखवणाऱ्या जिगरबाज शिलेदारांचाही सन्मान केला जातो. यावर्षी या विशेष पुरस्काराचे मानकरी ठरले, नागपूरचे उद्योजय जयसिंग चव्हाण.
अपंगत्वावर मात करून, प्रत्येक संकटाचा सामना करत, 'रंजना ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज' या छोट्याशा रोपाचं वटवृक्षात रूपांतर करण्याची किमया जयसिंग चव्हाण यांनी केली. त्यांच्या या कार्याला 'लोकमत'नं सलाम केला. गेट वे ऑफ इंडिया इथं भव्य दिव्य सोहळ्यात चव्हाण यांनी पुरस्कार स्वीकारला, तेव्हा उपस्थितांनी टाळ्यांचा गजर केला.
जयसिंग चव्हाण हे ८७ टक्के अस्थिव्यंग आहेत. डॉक्टरच्या एका चुकीमुळे वयाच्या १८व्या महिन्यात त्यांना अपंगत्व आलं होतं. पण, हार मानण्याची वृत्ती पहिल्यापासूनच नव्हती. कुटुंबाची पक्की साथ आणि स्वतःवरचा दृढ विश्वास या जोरावर त्यांनी आपल्या 'रंजना ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज'च्या माध्यमातून आज २०० हून अधिक लोकांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे रोजगार उपलब्ध करून दिला आहे. आईने खाऊसाठी दिलेल्या पैशातून सुरू केलेला साबण, डिटर्जंटचा व्यवसाय, त्यावरून झालेली चेष्टा, घरची बेताची परिस्थिती, अशातच २०१० मध्ये कारखान्याला लागलेली भीषण आग अशा परिस्थितीतून मार्ग काढत जयसिंग चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबानं केलेला प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे. आगीत बाकी सगळं राख झालं खरं, पण इरादे नेक होते. त्यामुळे त्या राखेतूनच जयसिंग चव्हाण यांनी फिनिक्ससारखी भरारी घेतली आणि आज ते 'उद्योग भूषण' झाले आहेत.
२००७ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते जयसिंग चव्हाण यांना उत्कृष्ट स्वयंरोजगार राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. २०२१-२२ च्या राष्ट्रीय दिव्यांग पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा सन्मान केला.