एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदी अॅडजस्ट झाले का? जयंत पाटलांच्या प्रश्नाला फडणवीसांचे थेट उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 19:49 IST2025-03-19T19:48:34+5:302025-03-19T19:49:27+5:30
LMOTY Awards 2025: 'एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपदाचा शर्ट चढवलेला आहे.'

एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदी अॅडजस्ट झाले का? जयंत पाटलांच्या प्रश्नाला फडणवीसांचे थेट उत्तर
LMOTY 2025: मुंबईतील राजभवनात बुधवारी(19 मार्च 2025) लोकमत महाराष्ट्राय ऑफ द इयर 2025 हा सोहळा पार पडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस(शप) पक्षाचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत फडणवीसांनी जयंत पाटलांच्या विविध प्रश्नांची उत्तरे दिले. यावेळी जयंत पाटलांनी फडणवीसांना एकनाथ शिंदेंबद्दल प्रश्न विचाराल. त्यावर मुख्यमंत्र्यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले.
काही लोकांना मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री होण्याची सवय असते. तुम्ही(देवेंद्र फडणवीस) मुख्यमंत्री होता, पुढे उपमुख्यमंत्री म्हणून अॅडजस्ट झालात. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होऊन अॅडजस्ट झाले का?
या प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणतात, 'मला कळतंय की, तुम्ही(जयंत पाटील) जो तीर सोडलाय की, काही लोकांना उपमुख्यमंत्री होण्याची सवय असते, तो अजितदादांच्या नावाने सोडलाय. अजितदादा उपमुख्यमंत्रीपदाचे रेकॉर्ड मोडणार आहेत. काही लोक त्यांना कायम उपमुख्यमंत्री म्हणतात. ते कायम उपमुख्यमंत्री राहावे असं काही नाही, आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत,' असं फडणवीस म्हणाले.
यावर 'आम्ही तर ते मुख्यमंत्री व्हावे, याच मताचे आहोत,' अशी प्रतिक्रिया जयंत पाटलांनी दिली. त्यावर फडणवीस आपल्या मिश्लिल शैलीत म्हणाले, 'जोपर्यंत ते मुख्यमंत्री होणार नाहीत, तोपर्यंत तुम्ही तिकडची राष्ट्रवादी सोडणार नाहीत.'
फडणवीस पुढे म्हणतात, 'एकनाथ शिंदेसाहेब असतील किंवा मी असेल, आम्हाला पद महत्वाचे नाही. ज्या पदावर असू, त्या पदाला न्याय द्यायचा, हे आमचे तत्व आहे. मी जेव्हा मुख्यमंत्र्याचा उपमुख्यमंत्री झालो, तेव्हा पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्रीपदाचे जॅकेट घातले आणि काम सुरू केले. आता शिंदेसाहेब मुख्यमंत्र्याचे उपमुख्यमंत्री झाले, ते जॅकेट घालत नाहीत, पण पांढरा शर्ट घालतात.'
'त्यांनी आपला उपमुख्यमंत्रीपदाचा शर्ट चढवलेला आहे. जी भूमिका मिळाली, ते चांगल्याप्रकारे वठवता आहेत. ते नगरविकास, एमएसआरडीसी, हाउसिंग सारखे महत्वाची खाती सांभाळत आहेत. त्या खात्याची कामे वेगाने झाली पाहिजे, याकडे त्यांचे लक्ष असते. आपण बघितले असेल विधानसभेत शिंदेसाहेब उपस्थित असतात, विरोधकांच्या प्रश्नांची उत्तरे देतात. कधीकधी तर तुमच्या अंगावर जाऊन तुम्हाला चुप करण्याचे कामही करतात,' असा टोला फडणवीसांनी यावेळी लगावला.