दौंड पंचायत समितीसाठी लॉबिंग
By Admin | Published: February 27, 2017 01:09 AM2017-02-27T01:09:26+5:302017-02-27T01:09:26+5:30
दौंड पंचायत समिती सभापती व उपसभापतिपदासाठी इच्छुकांनी लॉबिंग सुरू केले आहे.
केडगाव : दौंड पंचायत समिती सभापती व उपसभापतिपदासाठी इच्छुकांनी लॉबिंग सुरू केले आहे. माजी आमदार रमेश थोरात यांच्या गटाला १२ पैकी ११ जागा मिळाल्या असून, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सभापतिपद अडीच वर्षांसाठी इतर मागास प्रवर्गासाठी राखीव आहे. या पदासाठी केडगावचे झुंबर गायकवाड, बोरीपार्धीच्या मीना धायगुडे व मलठणच्या ताराबाई देवकाते थोरात गटाकडून दावेदार समजल्या जातात.
यामध्ये आमदार थोरात गटाकडून प्रत्येकी सव्वा वर्षासाठी माळी व धनगर समाजाला संधी दिली जाईल, अशी अपेक्षा आहे. खरी दावेदारी माळी समाजाचे झुंबर गायकवाड व धनगर समाजाच्या मीना धायगुडे यांच्यात असल्याचे चित्र आहे. दोन्ही उमेदवारांनी प्रतिकूल परिस्थितीत नेत्रदीपक यश मिळवले आहे. यामध्ये प्रथम संधी कुणाला मिळते? याकडे केडगाव व बोरीपार्धी परिसराचे लक्ष लागले आहे. उपसभापतिपदासाठी भांडगावचे नितीन दोरगे, पारगावचे सयाजी ताकवणे, खडकीचे प्रकाश नवले व सहजपुरचे सुशांत दरेकर ही नावे चर्चेत आहेत. यामध्ये निसटता विजय मिळवणारे सयाजी ताकवणे यांना गेली ३५ वर्षे सहकार व राजकारण याचा दांडगा अनुभव आहे. दौंड तालुका युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष नितीन दोरगे हे माजी सभापती मधुकर दोरगे यांचे पुतणे आहेत. पंचायत समितीमध्ये मिळालेली सर्वाधिक मते त्यांची दावेदारी बळकट करतात.
सभापतिपद पूर्व भागास दिल्यास पश्चिम भागातील आश्वासक चेहरा म्हणून ऐनवेळी प्रकाश नवले यांचे नाव पुढे येऊ शकते. नवले यांनी कुलसमर्थक माजी जिल्हा परिषद सदस्य संजय काळभोर यांचा पराभव केला आहे. एकूणच सभापती व उपसभापती पदांसाठी इच्छुकांच्या नावाबद्दल दौंड तालुक्यात कार्यकर्त्यांची चर्चा रंगली आहे. (वार्ताहर)
> जिल्हा परिषद सभापतिपदासाठी जगदाळे, शेळके चर्चेत
दौंडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने ६ पैकी ५ जागा जिंकून घवघवीत यश मिळविले आहे. त्यामुळे तालुक्याला १ जिल्हा परिषदेचे पद मिळणार हे निश्चित आहे. अध्यक्षपद इतर मागास संवर्गासाठी राखीव आहे. दौंडमधून इतर मागास संवर्गातून एकही उमेदवार नाही. या परिस्थितीत जिल्हा परिषदेचे माजी गटनेते वीरधवल जगदाळे यांना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद किंवा सार्वजनिक बांधकाम समितीचे सभापतिपद खुणावत आहे, तर सलग दुसऱ्यांदा निवडून आलेल्या केडगावच्या राणी शेळके यांच्या समर्थकांची महिला बालकल्याण सभापतिपदाची मागणी या परिसरात जोर धरत आहे.