स्थानिक पातळीवर युती अशक्य

By admin | Published: January 9, 2015 01:55 AM2015-01-09T01:55:11+5:302015-01-09T01:55:11+5:30

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक कार्यकर्त्यांची इच्छा नसेल तर शिवसेनेबरोबर युती होणार नाही

Local alliance impossible | स्थानिक पातळीवर युती अशक्य

स्थानिक पातळीवर युती अशक्य

Next

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक कार्यकर्त्यांची इच्छा नसेल तर शिवसेनेबरोबर युती होणार नाही. मात्र निवडणुकीनंतर गरज पडली तरच शिवसेनेबरोबर जाऊ, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी जाहीर केले.
प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर दानवे यांचे प्रथमच मुंबईत आगमन झाले. विमानतळावर आणि प्रदेश कार्यालयापाशी त्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना दानवे म्हणाले, सरकारमध्ये भाजपा-शिवसेना एकत्र असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मात्र शक्य असेल तेथेच युती केली जाईल. अन्यथा, स्वबळावर लढण्याचा निर्णय घेण्यास स्थानिक कार्यकर्ते मोकळे असतील. स्थानिक पातळीवरील निवडणुकीत युती झाली नाही, तर त्याचा सरकारवर काही परिणाम होणार नाही. प्रदेशाध्यक्षपदी पांडुरंग फुंडकर असताना दिवंगत नेते प्रमोद महाजन यांनी शत-प्रतिशत भाजपाचा नारा दिला होता. तेव्हापासून ही मोहीम सुरू असून, भाजपाला राज्यातील सर्वांत मोठा पक्ष करण्याचे उद्दिष्ट पूर्ण केले जाईल, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यात वाद नसून मीडियाने हेतूत: तसे चित्र निर्माण केले आहे, असा दावा दानवे यांनी केला. मुख्यमंत्री कोणत्या समाजाचा आहे त्यावर त्याचे मोठेपण ठरत नाही तर त्याने राज्याचा विकास कसा केला त्यावर ठरते. पुढील पाच वर्षांत मराठवाड्यालाही बरेच काही मिळेल, असा विश्वास दानवे यांनी व्यक्त केला. स्वतंत्र विदर्भाबाबत जनमत तयार करून मगच निर्णय घेतला जाईल, अशी पुस्ती त्यांनी जोडली. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Local alliance impossible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.