स्थानिक निवडणुकांत ताकद दिसली
By admin | Published: July 7, 2015 03:04 AM2015-07-07T03:04:51+5:302015-07-07T03:04:51+5:30
राज्य मंत्रिमंडळात व महामंडळावरील नियुक्त्यांमध्ये रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाला पाच टक्के वाटा देण्याची मागणी खासदार रामदास आठवले यांनी केली.
मुंबई : राज्य मंत्रिमंडळात व महामंडळावरील नियुक्त्यांमध्ये रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाला पाच टक्के वाटा देण्याची मागणी खासदार रामदास आठवले यांनी केली.
भाजपा व शिवसेनेची ताकद काय आहे ते वसई व भंडारा-गोंदियामधील निवडणुकीत दिसले, असा टोलाही आठवले यांनी लगावला.
रिपाइंच्या कार्यकारिणीची बैठक नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आली होती. आठवले म्हणाले की, मंत्रिमंडळ व महामंडळांबरोबर जिल्हा समित्यांमध्ये रिपाइंला स्थान दिले पाहिजे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मुंबईत येत असून, त्या वेळी आपण त्यांची भेट घेऊन त्यांना त्यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देणार आहे. मात्र महायुतीमधून बाहेर पडण्याचा विचार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंती दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामाजिक समरसता अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. अभियानातील समरसता या शब्दाला रिपाइंचा आक्षेप असून, त्याऐवजी समता या शब्दाचा वापर करावा, अशी मागणी मोदी यांच्याकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)