लोकल, मेट्रो ठप्प; रस्त्यांवर शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 05:34 AM2018-01-04T05:34:48+5:302018-01-04T05:37:12+5:30
मुंबई मेट्रोला ही महाराष्ट्र बंद आंदोलनाची झळ बसली. घाटकोपर, अंधेरी परिसरातील आंदोलनकर्त्यांनी सकाळी साडे अकराच्या सुमारास घाटकोपर मेट्रोकडे मोर्चा वळवल्याने प्रथमच मुंबई मेट्रो बंद ठेवावी लागली.
मुंबई - मुंबई मेट्रोला ही महाराष्ट्र बंद आंदोलनाची झळ बसली. घाटकोपर, अंधेरी परिसरातील आंदोलनकर्त्यांनी सकाळी साडे अकराच्या सुमारास घाटकोपर मेट्रोकडे मोर्चा वळवल्याने प्रथमच मुंबई मेट्रो बंद ठेवावी लागली.
आंदोलकांनी घाटकोपर येथील मेट्रो रुळावर सकाळी ११ वाजून ४५ मिनिटांनी उड्या घेत मेट्रो रोखून धरली. त्यावेळी तरुण आंदोलकांचा सहभाग लक्षणीय होता. यामुळे घाटकोपर ते एअरपोर्ट रोड मेट्रो फेरी बंद होती. दुपारच्या सत्रात एअरपोर्ट रोड ते वर्सोवा येथील वाहतूक सेवेवरही परिणाम झाला. सकाळपासून बंद असलेली मेट्रो सेवा सायंकाळी ५ वाजता पूर्ववत झाली. बंदच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांनी घरीच राहणे पसंत केले होते. त्यामुळे रस्त्यांवर शुुकशुकाट होता. मात्र, तरीही आंदोलनातील काही हुल्लडबाजांनी रस्त्यावर दिसेल ते वाहन अडविण्यास सुरुवात केली. दादर रेल्वे जंक्शनवर आंदोलकांनी ठिय्या देत, मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक दुपारी रोखून धरली. त्यामुळे सकाळपासून सुरळीत असलेली लोकल सेवा दुपारनंतर पुरती कोलमडली.
सर्वच सार्वजनिक सेवा बंद करण्यासाठी आंदोलक रस्त्यांवर उतरले होते. दादर, गोवंडी, दहिसर, गोरेगाव, घाटकोपर, कांजूर मार्ग, विक्रोळी, चुनाभट्टी रेल्वे स्थानकांवर ठिय्या देत आंदोलकांनी रेल्वेसेवा विस्कळीत केली. गोवंडीला आंदोलकांनी अडीच तास ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे रोखून धरला होता, तर वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरही ‘रास्ता रोको’मुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
पोलिसांना मारहाण
चेंबूर येथे आंदोलकांकडून झालेल्या मारहाणीत दोन पोलीस किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली तर गोवंडीतील आदर्शनगरमध्ये दुपारी सव्वा बाराच्या सुमारास आंदोलकांनी दगडफेक केली. या दगडफेकीत बेस्ट बसचे प्रचंड नुकसान झाले.
बेस्टच्या ५२ बसगाड्या फोडल्या
‘महाराष्ट्र बंद’ असतानाही बुधवारी बेस्टने एकूण ३ हजार ३७० पैकी ३ हजार २०८ बसेस रस्त्यावर उतरविल्या होत्या. त्यातील ५२ बसेसची तोडफोड झाली. या हल्ल्यांमध्ये चार बेस्ट चालक जखमी झाले आहेत.
पश्चिम उपनगरात मारहाण, जाळपोळ
दहिसरमध्ये आंदोलकांनी २ पेट्रोलपंपांवर तोडफोड केली. हिंदुस्थान नाक्यावर आंदोलकांनी रस्त्यावर टायर पेटवून टाकला. त्यामुळे काही काळ या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.