एसी लोकलचा प्रवासी पास लटकला?
By admin | Published: October 6, 2014 05:17 AM2014-10-06T05:17:13+5:302014-10-06T12:04:40+5:30
दिवसेंदिवस वाढत जाणारी गर्दी आणि त्यामुळे आवाक्याबाहेरचा लोकल प्रवास पाहता या गर्दीला आता पश्चिम रेल्वेच घाबरली आहे
मुंबई : दिवसेंदिवस वाढत जाणारी गर्दी आणि त्यामुळे आवाक्याबाहेरचा लोकल प्रवास पाहता या गर्दीला आता पश्चिम रेल्वेच घाबरली आहे. एसी लोकलसाठी मासिक पास असू नये, असे त्यांनी रेल्वे बोर्डाला पाठविलेल्या भाडे प्रस्तावात म्हटले आहे.
पश्चिम रेल्वेमार्गावर सिमेन्स कंपनीच्या लोकल धावत असून, या लोकल प्रवाशांच्या पसंतीस उतरल्या आहेत. आता एक दिवास्वप्न घेऊन पश्चिम रेल्वे आपल्या मार्गावर एसी लोकल चालविणार आहे. त्याची तयारीही करण्यात येत आहे. ही लोकल २0१३च्या अखेरीच येणार होती. मात्र आता थेट २0१५चा मुहूर्त मिळाला आहे.
दरम्यान, पश्चिम रेल्वेने एसी लोकलच्या भाड्याचा प्रस्ताव तयार केला आहे. तो मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला आहे. चर्चगेट ते बोरीवली मार्गावर ही ट्रेन धावणार आहे. त्यामुळे या मार्गावरील एसी बस, लोकलच्या फर्स्ट क्लासचे आणि मेट्रोचे भाडे तपासावे लागणार आहे. त्यानुसारच हा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मात्र, या प्रस्तावातून पश्चिम रेल्वेने एसी लोकलमध्ये मासिक पास असू नये, अशी शिफारस रेल्वे बोर्डाकडे केली आहे. (प्रतिनिधी)