लोकल प्रवाशांचा ‘सरकता’ प्रवास
By admin | Published: April 6, 2017 05:24 AM2017-04-06T05:24:13+5:302017-04-06T05:24:13+5:30
वृद्ध, गरोदर महिला, दिव्यांगांसह सर्वसामान्य प्रवाशांसाठी रेल्वेकडून स्थानकांवर सरकते जिने बसविण्यात येत आहेत.
मुंबई : वृद्ध, गरोदर महिला, दिव्यांगांसह सर्वसामान्य प्रवाशांसाठी रेल्वेकडून स्थानकांवर सरकते जिने बसविण्यात येत आहेत. मध्य व पश्चिम रेल्वेकडून मुंबई उपनगरीय लोकल स्थानकांवर सरकते जिने बसविले जात असतानाच, आणखी ११६ जिने बसविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पुढील वर्षापर्यंत हे जिने बसविले जातील, अशी माहिती मध्य व पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली. महत्त्वाची बाब म्हणजे, काही कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीचीही (सीएसआर) सरकते जिने उभारणीसाठी मदत होणार आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य व पश्चिम रेल्वेकडून सरकते जिने बसविण्याचे नियोजन केले जात आहे. सध्या मध्य रेल्वेमार्गावरील ११ स्थानकांवर १५ सरकते जिने बसविण्यात आले आहेत. यानंतर, आणखी ३५ सरकते जिने हे मध्य रेल्वे व एमआरव्हीसीकडून (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) बसविण्याचे नियोजन आहे. त्या व्यतिरिक्त सामाजिक उत्तरदायित्व निधीतून २५ सरकते जिने बसविण्यात येणार असून, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांनी केलेल्या करारानुसार, वेस्टर्न कोल फिल्ड्स लिमिटेड या कंपनीकडून ३0 कोटी रुपयांचा निधी देण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी दिली. अशा प्रकारे ६0 सरकते जिने पुढील वर्षापर्यंत बसविण्यात येतील. मध्य रेल्वेवर सरकते जिन्यांचे नियोजन केले जात असतानाच, पश्चिम रेल्वेवरही त्याचे नियोजन करण्यात आले आहे. पश्चिम रेल्वेवरील स्थानकांवर सध्याच्या घडीला २६ सरकते जिने कार्यरत आहेत. पुढील वर्षापर्यंत पश्चिम रेल्वे आणि एमआरव्हीसीतर्फे ३१ जिने बसविले जातील. त्याशिवाय कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतूनही २५ जिने बसविण्यात येणार असून, यातील पाच सरकत्या जिन्यांसाठी वेस्टर्न कोल फिल्डचा निधी असेल. त्यामुळे पश्चिम रेल्वेवर एकूण ५६ सरकते जिने बसविण्यात येतील, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितले. हे पाहता, पश्चिम व मध्य रेल्वेवर नव्याने बसविण्यात येणाऱ्या सरकत्या जिन्यांची संख्या ही ११६पर्यंत आहे. (प्रतिनिधी)
>मध्य आणि पश्चिम रेल्वेवर सुविधा
मध्य रेल्वे स्थानकातील सीएसटी, भायखळा, चेंबूर, पनवेल, बदलापूर, कर्जत स्थानकात प्रत्येकी दोन, तर चिंचपोकळी, परेल, माटुंगा, सायन, नाहूर, मुलुंड, कळवा, मुंब्रा, दिवा, शिवडी,
टिळकनगर, टिटवाळा, कसारा स्थानकात प्रत्येकी एक सरकता
जिना बसविण्यात येईल.
पश्चिम रेल्वे स्थानकातील लोअर परेल, माटुंगा रोड, वांद्रे, सांताक्रुझ, कांदिवली, दहिसर, भार्इंदर, नायगाव, वसई रोड, विरार स्थानकात प्रत्येकी दोन, तर नालासोपारा स्थानकात तीन आणि एलफिन्स्टन रोड, मालाड स्थानकात प्रत्येकी एक जिना बसविला जाईल.