दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना १५ ऑगस्टपासून करता येणार लोकल प्रवास - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2021 08:33 PM2021-08-08T20:33:54+5:302021-08-08T20:52:43+5:30

Uddhav Thackeray : ज्या प्रवाशांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तसेच दुसरी लस घेऊन 14 दिवस झाले असतील त्यांना आपण 15 ऑगस्ट पासून लोकलमधून प्रवास करता येईल, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

Local starts from 15th August for citizens who have taken both doses - Chief Minister Uddhav Thackeray | दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना १५ ऑगस्टपासून करता येणार लोकल प्रवास - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना १५ ऑगस्टपासून करता येणार लोकल प्रवास - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

googlenewsNext

मुंबई : राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. त्यामुळे काही जिल्ह्यात पहिल्या टप्पा म्हणून काही निर्बंध शिथिल केले आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रविवारी जनतेशी संवाद साधला. यावेळी मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल सेवा दोन्ही लस घेतलेल्या नागरिकांसाठी येत्या १५ ऑगस्टपासून सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

कोरोना काळामध्ये मुंबईतील उपनगरीय रेल्वेमधून सर्वसामान्य प्रवाशांना प्रवास करण्यासाठी निर्बंध टाकण्यात आले आहेत. यासंदर्भात अनेक प्रवासी संघटना तसेच नागरिकांनी वारंवार लोकल सेवा वापरण्यास परवानगी द्यावी अशी विनंती केली आहे. आपणा सर्वास माहीतच आहे की अद्याप आपण दुसऱ्या लाटेतून देखील पूर्णपणे सावरलेलो नाही.  संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका देखील आहे.  केंद्र सरकारने देखील आपणास वारंवार याबाबत इशारा दिला आहे. मात्र तरीदेखील अर्थचक्र सुरु ठेवण्यासाठी काही निकष आणि निर्बंध लावून सर्वसामान्य प्रवाशांना प्रवाशांना लोकलचा प्रवास करण्यास आपण मान्यता देत आहोत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगितले.

याचबरोबर, ज्या प्रवाशांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तसेच दुसरी लस घेऊन 14 दिवस झाले असतील त्यांना आपण 15 ऑगस्ट पासून लोकलमधून प्रवास करता येईल. ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहेत असे प्रवासी मोबाईल अॅपच्या माध्यमातून रेल्वेचा पास डाऊनलोड करू शकतील. ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही, असे प्रवासी शहरातील पालिकेची प्रभाग कार्यालये तसेच उपनगरीय रेल्वे स्थानकांवरून फोटो पासेस घेऊ शकतील. सर्वात महत्वाचं म्हणजे, लोकल प्रवासाच्या या पासेसवर  क्यू आर कोड असतील जेणेकरून रेल्वे प्रशासनाला त्याची सत्यता पडताळता येईल. मी आपणास विनंती करतो, की कुणीही अवैधरित्या, बेकायदेशीररित्या पासेस प्राप्त करून घेऊ नयेत. लसींचे दोन डोसेस घ्यावेत व प्रवास करावा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

'स्वातंत्र्य दिनाचा संघर्ष फक्त आठवायचा नाही, आता निश्चय करुया'
सात दिवसांनी आपला स्वातंत्र्या दिन येतोय. ७५ वा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करत आहोत. स्वातंत्र्य दिन म्हटल्यानंतर एक इतिहास वाचत असताना त्यावेळच्या पिढीने कसे झोकून देऊन संघर्ष केले, त्या काळच्या फक्त आठवणी काढून उपयोग नाही. आपल्याला कोरोना संकट जाईल असे वाटले होते. कमी-जास्त प्रमाणात लाटा धडकत आहेत. किती लाटा येतील याचा अजूनही अंदाज नाही. म्हणून या स्वातंत्र्य दिनाच्या आठ दिवस आधीच मी आपल्याला नम्र विनंती करतो. तो संघर्ष फक्त आठवायचा नाही तर आपणही आता निश्चय केला पाहिजे की, प्रतिज्ञा घेतली पाहिजे. जसं आपण दीडशे वर्षांचं राज्य उधळून लावलं. तसंच कोरोनाची ही टांगती तलवार उधळून लावू, ती उलथून टाकूच, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

'महापूरग्रस्तांसाठी तात्काळ मदत'
मुख्यमंत्री आल्यानंतर एका पॅकेजची घोषणा करतात अशी परंपरा आहे. मी पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर पॅकेजची घोषणा करणार नाही पण सगळ्यांना मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं. पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक घेतली. आजदेखील अनेक पालकमंत्री आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी हजर आहेत. आम्ही एक आढावा घेतला की काय करता येईल? आम्ही साडे अकरा हजार कोटींचा निधी जाहीर केला. तात्काळ मदत आणि लॉंगटर्म योजना करत आहोत. आपल्याला धोकादायक वस्त्यांचं पूनर्वसन करावं लागेल. तसेच पुराचं व्यवस्थापन करण्यासाठी दुरगामी योजना आखाव्या लागतील, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

कोरोनाशी मुकाबला सुरुच...
कोरोनाच्या पहिल्या लाटेत २० लाख, दुसऱ्या लाटेत ४० लाख लोक बाधित झाले असून  तिसऱ्या लाटेत ६० लाख लोक बाधित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याचे सांगतांना मुख्यमंत्र्यांनी त्यादृष्टीने राज्य शासनाने आपली तयारी केल्याचे स्पष्ट केले. त्यांनी २ चाचणी प्रयोगशाळांची संख्या आता ६०० वर गेल्याचे,  विलगीकरण रुग्णशैय्यांची संख्या ४.५  लाखांहून अधिक केल्याची माहिती दिली. राज्यात आयसीयुच्या ३४ हजार ५०७ तर ऑक्सिजनच्या १ लाख १० हजार ६८३ खाटा उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली.  १३५०० व्हेंटिलेटर्स आपल्याकडे आहेत असेही ते म्हणाले.

जिनोम सिक्वेन्सींग लॅब
कोरोना विषाणु आपला अवतार झपाट्याने बदलत आहे त्याचे परिणाम लक्षात घेऊन वेळेत उपचार करण्यासाठी मुंबई महापालिकेने जिनोम सिक्वेन्सींग लॅब सुरु केली आहे. याचा राज्याला ही उपयोग होईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.

ऑक्सिजन मर्यादा
राज्याची ऑक्सिजन निर्मिती आजही १३०० मे.टन दर दिवशी आहे. गेल्यावेळी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत १७००/१८०० मे.टन ऑक्सिजन दररोज लागला.  आपण ऑक्सिजन स्वावलंबन धोरण राबवित असलो तरी तातडीने ऑक्सिजन निर्मितीला मर्यादा आहेत. इतर राज्यात आता पुन्हा रुग्णवाढ दिसू लागली आहे. त्याचा अंदाज घेऊन राज्यात  पुन्हा रुग्णवाढ झाली तर नाईलाजाने लॉकडाऊन करावे लागेल हे ही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

काही ठिकाणी निर्बंध शिथिल पण...
राज्यात सिंधुदुर्ग रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सातारा, अहमदनगर, बीड, पुणे, सांगली अशा काही  जिल्ह्यात अजून कोरोना संसर्ग वाढता आहे ते जिल्हे सोडून उर्वरित ठिकाणी काही निर्बंध शिथील केले आहेत. कोरोनामुक्त गावासारखी संकल्पना आपण राबवित आहोत. अनेकांनी यादिशेने योग्य पाऊले टाकायला सुरुवातही केली आहे. उद्योजक, कंपन्यांनी आपल्या कामाच्या वेळा बदलून शिफ्टमध्ये कामगारांना बोलवावे, शक्य असलेल्या कंपन्यांनी  त्यांच्या कामगारांची राहण्याची सोय त्यांच्या कॅम्पसमध्येच करावी अशी विनंती केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

टास्कफोर्सच्या बैठकीनंतर निर्णय
रेस्टॉरंट, मॉल, प्रार्थनास्थळे याबाबत  टास्कफोर्सशी चर्चा करून  निर्णय घेऊ असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रातील जनतेने राज्य शासनाला आतापर्यंत सहकार्य केले म्हणूनच मुंबई मॉडेलचे, महाराष्ट्राचे कौतूक जगभर झाले. याचे सर्व  श्रेय माझे नसून राज्यातील जनतेचे  असल्याचेही ते म्हणाले.

राज्यात ४ कोटी ६३ लाख ७६ हजार नागरिकांना लसीचे डोस
राज्यात ४ कोटी ६३ लाख ७६ हजार नागरिकांना लसीचे डोस देण्यात आले. यामध्ये पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या ३ कोटी ४५ लाख ३० हजार ७१९ आहे तर दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या १ कोटी १८ लाख ४६ हजार १०७ आहे. पहिला डोस देण्यात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. राज्याची लसीकरण क्षमता फार मोठी आहे आपण एका दिवसात आठ ते दहा लाख नागरिकांचे लसीकरण करू शकतो परंतु लसीची मर्यादित उपलब्धता लक्षात घेता आज घडीला मास्क हाच आपला खरा संरक्षक असल्याचेही  ते म्हणाले

Read in English

Web Title: Local starts from 15th August for citizens who have taken both doses - Chief Minister Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.