सामान्य मोबाइलवरही लोकलचे तिकीट

By admin | Published: October 10, 2015 02:00 AM2015-10-10T02:00:13+5:302015-10-10T02:00:13+5:30

स्मार्ट फोनवर मोबाईल तिकिट (प्रिंट तिकिट) व पेपरलेस मोबाईल तिकिट सेवा रेल्वेकडून उपलब्ध करण्यात आल्याने सामान्य मोबाईल बाळगणारे प्रवासी यापासून वंचित आहेत.

Local Ticket on General Mobile | सामान्य मोबाइलवरही लोकलचे तिकीट

सामान्य मोबाइलवरही लोकलचे तिकीट

Next

- सुशांत मोरे,  मुंबई
स्मार्ट फोनवर मोबाईल तिकिट (प्रिंट तिकिट) व पेपरलेस मोबाईल तिकिट सेवा रेल्वेकडून उपलब्ध करण्यात आल्याने सामान्य मोबाईल बाळगणारे प्रवासी यापासून वंचित आहेत. सामान्य मोबाईल बाळगणाऱ्या प्रवाशांनाही मोबाईल तिकिट सेवेचा (प्रिंट तिकिट) लाभ घेता यावा यासाठी त्यावरही रेल्वेच्या क्रिस संस्थेकडून काम केले जात आहे.
मार्च २0१६ पर्यंत ही सेवा सामान्य मोबाईल बाळगणाऱ्या प्रवाशांना उपलब्ध केली जाईल, अशी माहिती क्रिसकडून देण्यात आली. मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गासाठी पेपरलेस मोबाईल तिकिट सेवेचा शुभारंभ शुक्रवारी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते नवी दिल्लीतून व्हिडीओ कॉन्फरसिंगव्दारे करण्यात आला. याचबरोबर पश्चिम तसेच मध्य रेल्वेवर पेपरलेस मोबाईल पास आणि प्लॅटफॉर्म तिकिट सुविधाही सुरु करण्यात आली. या सेवेमुळे मोबाईलवर आलेले तिकिट, पास आणि प्लॅटफॉर्म तिकिटही ग्राह्य धरले जाईल. यावेळी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनिल कुमार सूद, पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापक उपस्थित होते. सामान्य मोबाईलवरील तिकिटाबाबत क्रिसचे महाव्यवस्थापक उदय बोभाटे यांनी सांगितले की, सामान्य मोबाईल असलेल्या प्रवाशांचा विचार करता त्यांना मोबाईल तिकिट सेवा उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मार्च २0१६ पर्यंत ही सेवा त्यांच्यासाठी सुरु होईल. तिकिट काढण्यासाठी त्यांना एक नंबर मिळेल. तो नंबर डायल करावा लागेल आणि त्यावर एक मॅसेज येईल. अशा प्रकारे पुढील आणखी दोन स्टेप्सनंतर त्यांना स्थानकात जाऊन एटीव्हीएममधून तिकिटाची प्रिंट घ्यावी लागेल. त्यामुळे त्यांचीही तिकिटांच्या रांगेतून सुटका होईल, असा विश्वास बोभाटे यांनी व्यक्त केला. शुक्रवारी सीओटीव्हीएमचाही (करन्सी कम कॉईन कम स्मार्ट कार्ड आॅपरेटेड आॅटोमॅटीक तिकिट वेंडिंग मशिन) शुभारंभ करण्यात आला. या मशिनमध्ये लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी विना सवलतींचे दुसऱ्या श्रेणीचे तिकिट व उपनगरीय गाड्यांसाठी दुसऱ्या व प्रथम श्रेणीचे तिकिट तसेच रिटर्न तिकीट मिळेल. तसेच स्मार्ट कार्डचेही रिचार्ज होईल. ही मशिन ५ आणि १0 रुपयांची नाणी तसेच ५ रुपयांपासून ते एक हजार रुपयांपर्यंतच्या महात्मा गांधीजीच्या सिरीजमधील नोटा स्वीकारेल. अशोक चिन्ह असणाऱ्या नोटा हे यंत्र स्वीकारणार नाही, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली. गैरप्रकार टाळण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. मध्य रेल्वेवर ११0 आणि पश्चिम रेल्वेवर ७0 मशिन बसवण्यात येणार आहेत.

पेपरलेस प्लॅटफॉर्म तिकीट
प्लॅटफॉर्म तिकीट मध्य रेल्वेवरील सीएसटी, दादर, पनवेल, ठाणे आणि एलटीटी तर पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेन्ट्रल, बोरीवली, अंधेरी, दादर, वसई रोड आणि बान्द्रा स्थानकासाठी पेपरलेस मोबाईल प्लॅटफॉर्म तिकिट उपलब्ध होईल.

प्रवाशांना त्वरीत तिकिट उपलब्ध व्हावे म्हणूनच मोबाईल तसेच पेपरलेस मोबाईल तिकिट सेवा सुरु करण्यात आली आहे. आणखीही काही सेवा प्रवाशांसाठी उपलब्ध केल्या जातात का यासाठी प्रयत्न केला जात आहे.
- सुरेश प्रभू, रेल्वेमंत्री

Web Title: Local Ticket on General Mobile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.