‘ग्लोबलायझेशनमध्ये लोकलायझेशन जपावे’
By Admin | Published: October 31, 2016 02:15 AM2016-10-31T02:15:21+5:302016-10-31T02:15:21+5:30
हल्ली जग वेगाने बदलत आहे. या ग्लोबलायझेशनच्या युगात लोकलायझेशन जपणे आता महत्त्वाचे झाले आहे
मुंबई: हल्ली जग वेगाने बदलत आहे. या ग्लोबलायझेशनच्या युगात लोकलायझेशन जपणे आता महत्त्वाचे झाले आहे. विलेपार्ल्याने देखील हे लोकलायझेशन जपल्याचे मत लेखक आणि विचारवंत अच्युत गोडबोले यांनी व्यक्त केले; किंबहुना हेच पार्लेकरांचे वैशिष्ट्य असल्याचे ही दिसून येत असल्याचे गोडबोले यांनी सांगितले.
विलेपार्ले पश्चिमेकडील लोकमान्य सेवा संघ येथील पु.ल. देशपांडे सभागृहात आयोजित ‘आम्ही पार्लेकर’च्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून गोडबोले बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर यांची उपस्थिती होती. ‘आम्ही पार्लेकर’चे ज्ञानेश चांदेकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
अध्यक्षीय भाषणात गोडबोले म्हणाले की, आगामी युग हे तंत्रज्ञानाच्या एकत्रिकरणाचे आहे. त्यामुळे भविष्याची चाहूल घेत त्यादृष्टीने हालचाली करण्याची गरज आहे. ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर म्हणाले की, पार्लेकरांचे आयुष्य समृद्ध करणारा हा स्तुत्य उपक्रम आहे. पार्ल्यात काय घडत आहे, या सोबत पार्ल्यात काय घडायला हवे याचा विचार करत पार्ल्याचे पालकत्व घेतल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)
लोकचळवळींचा सन्मान
या कार्यक्रमात स्थानिक पातळींवर काम करणाऱ्या लोकचळवळींचा सन्मान झाला. यात २८ वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या जनसेवा समिती, ज्येष्ठ व गरजूंसाठी काम करणारे मराठी मित्र मंडळ, स्वच्छता उपक्रम राबवणारे स्वच्छ पार्ले अभियान, सुंदर पार्ले हरित पार्ले संकल्पना राबविणारे वृक्षमित्र व स्थानक परिसर स्वच्छ करणाऱ्या आय अॅक्ट या लोकचळवळींचा गौरव करण्यात आला.