Lockdown: नगरकरांना इतर जिल्ह्यांत ‘नो एण्ट्री’; आणखी आठ गावांत लॉकडाऊन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 08:10 AM2021-10-06T08:10:38+5:302021-10-06T08:10:59+5:30
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ५ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून ते १४ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपर्यंत म्हणजे दहा दिवस लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे
अहमदनगर : कोरोना रुग्णांची संख्या दहापेक्षा जास्त झाल्याने जिल्ह्यातील आणखी आठ गावांमध्ये दहा दिवसांचा लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी घेतला आहे. त्यानुसार निघोजसह पारनेर तालुक्यातील चार गावे, नेवासा तालुक्यातील एक, संगमनेर तालुक्यातील तीन आणि शेवगाव तालुक्यातील एक अशा आठ गावांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यात बंद झालेल्या गावांची संख्या आता ६८ झाली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ५ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून ते १४ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपर्यंत म्हणजे दहा दिवस लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. शाळा, धार्मिक स्थळांसह, दुकाने, वस्तू विक्री, सेवा बंद राहणार आहेत. नागरिकांनाही गावात येण्यास व बाहेर जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा मात्र सुरू राहणार आहेत. याबाबत विभागीय आयुक्त आज येथे येत असून बैठक होणार आहे.
नगरकरांना इतर जिल्ह्यांत ‘नो एण्ट्री’
कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि ६८ गावे लॉकडाऊन केल्याची बातमी राज्यभर पसरली आहे. इतर जिल्ह्यांतील नागरिकही त्यांच्या नगर येथील नातेवाइकांना फोन करून माहिती घेत आहेत. नगर जिल्ह्यात आम्ही यावे की नाही, अशी विचारणाही केली जात आहे. नगर जिल्ह्यातील नागरिकांची नाशिकला येताना अँटिजेन चाचणी करण्यात येणार आहे. असाच निर्णय औरंगाबाद महापालिका प्रशासनही घेणार आहे.