लॉकडाऊनमुळे ४३ टक्के सामान्य नैराश्याच्या गर्तेत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 06:19 AM2020-07-30T06:19:52+5:302020-07-30T06:20:04+5:30

अभ्यासातील निष्कर्ष : निरुत्साह, सतत कंटाळा, झोपेच्या समस्यांनी अनेक जण झाले त्रस्त

Lockdown causes 43% general depression | लॉकडाऊनमुळे ४३ टक्के सामान्य नैराश्याच्या गर्तेत

लॉकडाऊनमुळे ४३ टक्के सामान्य नैराश्याच्या गर्तेत

googlenewsNext

स्नेहा मोरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून मागील पाच महिन्यांमध्ये ४३ टक्के सामान्य नैराश्याच्या गर्तेत अडकल्याचे धक्कादायक वास्तव एका अभ्यासातून समोर आले आहे. मानसिक आरोग्याविषयी केलेल्या या अभ्यासानुसार, २६ टक्के सामान्य लोकांना नैराश्याची (डिप्रेशन) सौम्य लक्षणे असल्याचे समोर आले, तर ११ टक्के लोकांनी काही प्रमाणात नैराश्य आल्याचे म्हटले आहे. याशिवाय सहा टक्के लोकांमध्ये नैराश्याची तीव्र लक्षणे दिसून येत आहेत. मानसिक आरोग्याविषयीचा हा अभ्यास ‘गोकी’ या स्मार्ट हेल्थ इकोसिस्टिमचा अभ्यास करणाऱ्या संस्थेने केला आहे.


सध्याचा लॉकडाऊनचा काळ सामान्य लोकांसाठी मानसिक आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही कठीण जात आहे. कोरोनाची भीती, लॉकडाऊन, रोजगार नसल्याची किंवा थांबल्याची चिंता, आरोग्यविषयक समस्या, आजूबाजूचे वातावरण, सेप्रेशन अ‍ॅन्झायटी अशा अनेक समस्यांमुळे मानसिक ताण वाढताना दिसत आहे. मानसिक ताण हा नैराश्यावस्थेत रूपांतर घेत असतो, असे या अभ्यासात म्हटले आहे.
अहवालानुसार, ५७ टक्के व्यक्तींना दररोज निरुत्साही वाटणे, सतत कंटाळा येणे, झोपेची समस्या उद्भवणे किंवा जास्त वेळ झोपणे अशा तक्रारी उद्भवत आहेत.


लॉकडाऊनमुळे बहुतांश व्यक्तींचे झोपेचे वेळापत्रक बिघडल्याचे समोर आले आहे. या अभ्यासानुसार, मानसिक स्वास्थ्याचे संतुलन राखण्यासाठी ध्यानधारणा, योग वा व्यायाम करणे गरजेचे आहे. पाच महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे. या काळात सामाजिक, आर्थिक बदल होत आहेत. या परिस्थितीला सामोरे कसे जायचे, हा प्रश्न पडतो. हाच भावनिक आवेग इतका जोरदार असतो की त्यातून या काळात मानसिक आधाराची गरज वाटते. अशा वेळी मनातील भावना, ताण व्यक्त करायला हवा. ही परिस्थिती स्वीकारून भावनिक, मानसिक सहनशक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. या परिस्थितीशी दोन हात करताना सकारात्मक बाजू तपासून घ्यायला हव्यात, असे मानसोपचातज्ज्ञ डॉ. नितीन जैन यांनी सांगितले.

उपाय आहे, घाबरू नका!
एखाद्या भळभळत्या जखमेएवढीच तीव्र यातना देणारा, पण कुणाला न दिसणारा हा आजार आहे. दु:ख विसरावे, सहन करावे असा त्रासदायी गैरसमज आहे. नैराश्यासाठी विशिष्ट औषधे असून ती परिणामकारक आणि सुरक्षित आहेत. नैराश्यात समुपदेशनाचा विशेष उपयोग होतो. पण समुपदेशकांशी नुसत्या गप्पा मारून निराशा कमी होते हा खूप मोठा गैरसमज आहे. समुपदेशन म्हणजे एक प्रकारचे शिक्षणच असते, त्यात रुग्णाला मेहनत घ्यावी लागते. नैराश्याचे प्रमाण कमी असेल, योग्य प्रशिक्षित समुपदेशक असेल आणि सांगितलेले बदल करण्याची रुग्णात क्षमता असेल तर समुपदेशनाचा चांगला उपयोग होतो. समुपदेशन डोळसपणे घ्यावे. अन्यथा त्याचेही दुष्परिणाम होऊ शकतात. औषध आणि समुपदेशन, दोन्ही एकत्र घेणे योग्य आहे.
- डॉ. नवीन शाह, मानसोपचारतज्ज्ञ, समुपदेशक

Web Title: Lockdown causes 43% general depression

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.