महाराष्ट्रात २८ फेब्रुवारीपर्यंत लॉकडाऊन वाढला; अनलॉक अंतर्गत देण्यात आलेली सूट कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2021 12:55 PM2021-01-29T12:55:24+5:302021-01-29T12:58:07+5:30
सर्वांसाठी रेल्वेसेवा सुरू होणार, पाहा कधी करता येणार प्रवास
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्यानंतर राज्यात अनलॉक प्रक्रिया (मिशन बिगीन अगेन) सुरू झाली असली तरी काही बंधन कायम ठेवण्यात आली होती. त्यानुसार राज्य सरकारनं लॉकडाउनचा कालावधी २८ फेब्रुवारीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील ठाकरे सरकारनं लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. २८ फेब्रुवारी पर्यंत राज्यात आता लॉकडाऊन लागू राहणार आहे. अनलॉक अंतर्गत ज्या गोष्टींना परवानगी देण्यात आली आहे त्या गोष्टी सुरूच राहणार असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. तसंच लॉकडाऊन संबंधीच्या यापूर्वीच्या मार्गदर्शक सूचना २८ फेब्रुवारीपर्यंत कायम राहणार आहेत.
लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला असून यापूर्वी सरकारनं वेळोवेळी जारी केलेले आदेश लागू असणार आहेत. यापूर्वी ३० सप्टेंबर आणि १४ ऑक्टोबर रोजी मिशन बिगीन अगेन अंतर्गत काही निर्बंध शिथिल करण्यात आले होते. यानुसार देण्यात आलेली सूट ही कायम राहणार असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क बंधनकारक. सामाजिक अंतर राखणं गरजेचं, सतत हात धुणे आवश्यक असल्याच्या सूचनाही सरकारकडू देण्यात आल्या आहेत.
Maharashtra government extends #lockdown till February 28.
— ANI (@ANI) January 29, 2021
"Activities already allowed and permitted from time to time shall be continued and all earlier orders shall be aligned with this order and shall remain in force up to 28
February," reads statement.
सर्वांसाठी रेल्वेसेवा सुरू होणार
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा परवानगी दिलेल्या काही मर्यादित प्रवाशांसाठीच सुरु होती मात्र १ फेब्रुवारीपासून गर्दी होणार नाही अशा वेळा आखून सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपनगरीय सेवा सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. यामुळे सर्वाना यातून प्रवास करता येईल तसेच त्यांची होणारी गैरसोयही टळेल. याशिवाय मुंबई व उपनगरातील विविध कार्यालये व आस्थापना यांनी कामाच्या वेळांमध्ये सुधारणा करावी जेणेकरून सर्वाना सुविधा होईल असंही यासंदर्भात आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
BIG BREAKING: १ फेब्रुवारीपासून सर्वांना लोकल प्रवास करता येणार, पण ठराविक वेळेतच; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
कधी प्रवास करता येईल
सर्व प्रवाशांना सकाळच्या पहिल्या लोकलपासून सकाळी ७ वाजेपर्यंत तसेच दुपारी १२ पासून दुपारी ४ पर्यंत आणि रात्री ९ पासून शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करता येईल.