Lockdown in Maharashtra: लवकरच नवा नियम; किराणा दुकाने केवळ सकाळी ७ ते ११ पर्यंत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 06:16 AM2021-04-20T06:16:57+5:302021-04-20T06:17:13+5:30
Lockdown in Maharashtra: कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेऊन छोटे जिल्हे, तसेच रोजचा मंत्रालयात संबंध होत नसलेले दुर्गम भागातील जिल्हाधिकारी यांच्या भागात जिल्ह्याच्या पालक सचिवांनी अधिक कार्यक्षमतेने काम करणे गरजेचे आहे, असे राजेश टोपे म्हणाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : किराणा सामान खरेदी करण्याच्या नावाखाली लोक दिवसभर फिरताना दिसतात. त्यावर पायबंद घालण्यासाठी राज्य स्तरावरून कठोर निर्णय घेतला जावा, त्यासाठी राज्यभरातील किराणा सामानाची दुकाने सकाळी सात ते सकाळी अकरा या वेळेत चालू ठेवण्याचा निर्णय घेण्याचे बैठकीत ठरले, अशी माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. त्याबद्दलचे आदेश मंत्रालयातून लवकरच काढले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेऊन छोटे जिल्हे, तसेच रोजचा मंत्रालयात संबंध होत नसलेले दुर्गम भागातील जिल्हाधिकारी यांच्या भागात जिल्ह्याच्या पालक सचिवांनी अधिक कार्यक्षमतेने काम करणे गरजेचे आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे ३० एप्रिलपर्यंत आणखी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, अशीही बैठकीत चर्चा झाली. महाराष्ट्रात तयार होणारा १,२५० मेट्रिक टन ऑक्सिजन पूर्णपणे वैद्यकीय सेवेसाठी वापरला जात असून, ३०० मेट्रिक टन ऑक्सिजन बाहेरून आणला जात आहे. ऑक्सिजन टँकरच्या साहाय्याने ट्रेनमधून ऑक्सिजन आणण्याची सुरुवात आपण केली आहे. सोमवारी रात्री एक ट्रेन रवाना झाली आहे. सोमवारी आपण १,५५० मेट्रिक टनापर्यंत गेलो आहोत. केंद्र सरकारने एप्रिलपर्यंत १,८०० मेट्रिक टनापर्यंत आपण जाऊ, असे सांगितले आहे, पण रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली, तर ३० तारखेनंतर ऑक्सिजनची अडचण होऊ शकते. भविष्यात ऑक्सिजनची गरज वाटली, तर काय करायचे, यावरही बैठकीत चर्चा झाली. त्यासाठी एएसयू आणि पीएसयू या दोन अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी ऑक्सिजन तयार करणारे युनिट उभे करावेत, यावरही निर्णय झाल्याचे टोपे म्हणाले.
जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या पातळीवर यासाठी तातडीने निर्णय घेणे गरजेचे आहे, त्यासाठी कोणाच्या परवानगीची त्यांना गरज नाही. ऑक्सिजनच्या उभारणीसाठी पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी वेळ न घालवता हे निर्णय अंमलात आणावेत, अशा सूचना त्यांना दिल्याचे टोपे म्हणाले. त्यासाठी विनाटेंडर ते काम करू शकतील. रेमडेसिविरसाठीही केंद्र सरकारने सात कंपन्यांना नवीन वीस प्लांट उभे करण्याची परवानगी दिली आहे, येत्या काही दिवसांत त्यांची अडचणही दूर होईल, असे त्यांनी सांगितले.
पोलिसांनी काही विचारले की, किराणा सामान घ्यायला जात आहे, अशी उत्तरे दिली जातात व विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे विनाकारण फिरणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. किराणा मालाची दुकाने सकाळी सात ते सकाळी अकरा एवढ्या वेळेत चालू ठेवावी. जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवर हा निर्णय होऊ नये, मंत्रालयातूनच त्या विषयीचे आदेश काढले जातील. - राजेश टोपे, आरोग्यमंत्री