Lockdown News: गड्या आपला गाव बरा...अडकलेले मजूर लागले परतू: नाशिकहून दोन गाड्या रवाना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2020 06:49 IST2020-05-03T03:00:20+5:302020-05-03T06:49:17+5:30
मुंबईतून गाड्या सोडण्याबाबत अजून अनिश्चितता

Lockdown News: गड्या आपला गाव बरा...अडकलेले मजूर लागले परतू: नाशिकहून दोन गाड्या रवाना
नवी दिल्ली/नाशिक : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील लॉकडाउननंतर तब्बल ४२ दिवसांनी रेल्वेने प्रवासी वाहतूक सुरू केली असून, त्यामुळे विविध राज्यांत अडकून पडलेल्या स्थलांतरित मजूर, विद्यार्थी आणि भाविकांना आपल्या घरी परतणे शक्य झाले आहे. राज्यात नाशिकहून भोपाळ आणि लखनौ येथे प्रत्येकी एक गाडी रवाना झाली, तेव्हा गाडीतील मजुरांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. सर्वांनी रेल्वे कर्मचाऱ्यांचे आभार मानले. मात्र, कोणत्या गाडीने कोणी जायचे, हे स्थानिक जिल्हा प्रशासन ठरविणार आहे.
नाशिकमध्ये दीड महिन्यापासून असलेल्या सुमारे ८४३ नागरिक महिला व मुलांना शनिवारी सकाळी विशेष रेल्वेने उत्तर प्रदेशातील लखनौ येथे रवाना करण्यात आले, तर शुक्रवारी सायंकाळी ३३२ कामगारांना ६ डब्यांच्या विशेष रेल्वेने भोपाळ येथे पाठविण्यात आले.
तिकीट स्वत:च काढा...
नावे नोंदविलेल्यांनाच ओळखपत्र देऊन आणि वैद्यकीय तपासणी करून गाडीत बसविले जाईल. या गाड्या प्रवासातील मधल्या स्थानकांवर थांबणार नाहीत. क्षमतेच्या ६० ते ७५ टक्के लोकच प्रवास करू शकतील. तिकिटाची रक्कम संबंधिताने द्यायची आहे. ही रक्कम राज्य सरकारांनी द्यावी, असे रेल्वेचे म्हणणे होते; पण बिहारने त्यास नकार दिला. त्यामुळे मजूर, भाविक व विद्यार्थ्यांना तिकिटासाठी पैसे मोजावे लागत आहेत.
केरळला ४०० गाड्या लागणार
केरळहून शनिवारी रात्री चार गाड्या उत्तर भारतात रवाना झाल्या. केरळमधील परप्रांतीय मजुरांसाठी ४०० गाड्या लागतील, असे मुख्यमंत्री पी. विजयन म्हणाले. महाराष्ट्रातून आणखी कोठून आणि किती गाड्या जाणार, हे स्पष्ट झालेले नाही. केरळच्या तुलनेत महाराष्ट्रात जास्त परप्रांतीय मजूर आणि विद्यार्थी आहेत.
अन्य राज्येही धास्तावली
मजूर, विद्यार्थी रेल्वेतून आपल्या राज्यात उतरल्यानंतर तेथेही त्यांची तपासणी होईल. कोणामध्ये कोरोनाची लक्षणे वा आजार आढळल्यास त्यांना रुग्णालयात नेले जाईल. नांदेडहून पंजाबला बसने गेलेले ३१४ जण पॉझिटिव्ह आढळल्याने अन्य राज्येही धास्तावली आहेत.