Corona Lockdown: राज्यात पुन्हा लॉकडाऊन परतू लागला; 'हा' महत्वाचा जिल्हा आजपासून बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2021 09:08 AM2021-07-03T09:08:42+5:302021-07-03T10:11:32+5:30
Lockdown in Satara: जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सोमवार ते शुक्रवार हे निर्बंध लागू असतील. तसेच शनिवार आणि रविवार हे दोन दिवस जिल्ह्यात पूर्णतः संचारबंदी पुढेही सुरू राहणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्ण वाढीचा दर १० टक्क्यांच्यावर गेला असल्याने सातारा जिल्हा चौथ्या स्तरामध्ये समाविष्ट झाला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये चौथ्या स्तरामधील निर्बंध लागू केले असून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी काढले आहेत. (Lockdown restrictions in Satara from today. Only essential services will open.)
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सोमवार ते शुक्रवार हे निर्बंध लागू असतील. तसेच शनिवार आणि रविवार हे दोन दिवस जिल्ह्यात पूर्णतः संचारबंदी पुढेही सुरू राहणार आहे. अत्यावश्यक सेवेमध्ये किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळविक्रेते, डेअरी, बेकरी, मटन, चिकन, अंडी, मासे विक्री दुकाने, कोल्ड स्टोरेज, गोदामे, रुग्णालय, निदान केंद्रे, लसीकरण केंद्रे, वैद्यकीय विमा कार्यालय, औषधे दुकाने, औषधी कंपन्या, वैद्यकीय उपकरणे विक्रीची दुकाने, सेबीच्या नियंत्रणातील सर्व कार्यालये, भारतीय रिझर्व बँकेने नियुक्त केलेल्या सर्व सेवा, विद्युत आणि गॅस पुरवठा, पेट्रोल पंप, पेट्रोलियम संबंधी उत्पादने, सर्व प्रकारच्या वित्तसंस्था, वृत्तपत्रे यांना परवानगी राहणार आहे.
राज्य शासनाच्या २५ जून रोजी काढण्यात आलेल्या आदेशानुसार आरटीपीसीआर चाचण्यांद्वारे जी रुग्णवाढ नोंदवली जाते, त्यानुसार संबंधित जिल्ह्याचा स्तर ठरविण्याच्या सूचना जिल्हाधिकार्यांना करण्यात आल्या आहेत. आरटीपीसीआर चाचण्यानुसार सातारा जिल्ह्याचा रुग्ण वाढीचा दर १२ टक्क्यांवर जाऊन पोहोचला. त्यामुळे जिल्हाधिकार्यांनी हे निर्बंध लागू केले आहेत.
साताऱ्यात काय सुरु काय बंद...
- सर्व शाळा महाविद्यालय कोचिंग क्लासेस पूर्णपणे बंद राहणार
- अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त सर्व दुकाने बंद राहणार
- अत्यावश्यक बाबींची दुकाने आता सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू राहणार
- हॉटेल, रेस्टॉरंट बंद राहतील, पार्सल सेवा सकाळी ९ ते रात्री ८ वेळेत सुरू राहील
- कोणत्याही क्रीडा स्पर्धा घेता येणार नाहीत
- सामाजिक सांस्कृतिक धार्मिक प्रार्थना स्थळ राहणारया बाबी निर्बंध पाळून सुरू राहतील
- सार्वजनिक जागा, खुली मैदाने या ठिकाणांवर सोमवार ते शुक्रवार पहाटे ५ ते सकाळी ९ या वेळेत व्यायाम व चालण्यास परवानगी आहे.
- लग्न आणि अंत्यविधी यांच्यासाठी निर्बंध ठेवून परवानगी
- बांधकामांना परवानगी मात्र कामगारांच्या राहण्याची व्यवस्था करणे आवश्यक
- कृषी दुकाने आठवडाभर दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू राहतील
- केश कर्तनालय सुरू राहतील
- सार्वजनिक परिवहन बस सेवा ५० टक्के क्षमतेने सुरू राहील
- मालवाहतूक सुरु ठेवण्यास परवानगी
- खासगी वाहने, टॅक्सी, बसेस, लांब पल्ल्याच्या रेल्वेद्वारे आंतरजिल्हा प्रवास करण्यास परवानगी
- आयसोलेशन बबलमध्ये चित्रीकरणास परवानगी
- बाजार समित्या सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहतील
.... यांना ई पास बंधनकारक
पाचव्या स्तरातील जिल्ह्यातून जे प्रवासी सातारा जिल्ह्यात येणार आहेत त्यांना ई पास बंधनकारक आहे. पास नसेल तर त्यांना प्रवेश दिला जाणार नाही. त्या व्यतिरिक्त पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या स्तरातील जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांना ई पासचे बंधन राहणार नाही.
मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी..
सर्व शाळा महाविद्यालय यांचे ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची गरज पडते आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील रिक्त असणारी शैक्षणिक साहित्याची दुकाने जरी बंद ठेवण्यात येणार असली तरी संबंधितांना घरपोच साहित्य देता येणार आहे.