१ सप्टेंबरनंतरही राज्यात लॉकडाऊन कायम राहणार! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सूतोवाच

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 02:46 AM2020-08-25T02:46:54+5:302020-08-25T08:38:07+5:30

सुरू केलेल्या गोष्टी पुन्हा बंद होऊ देऊ नका, १ सप्टेंबरपासून शाळा उघडण्याबाबत केंद्र सरकार विचार करीत असले तरी राज्यातील शाळा इतक्यात उघडण्याची शक्यता नाही.

Lockdown will continue in the state even after September 1! Chief Minister Uddhav Thackeray's speech | १ सप्टेंबरनंतरही राज्यात लॉकडाऊन कायम राहणार! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सूतोवाच

१ सप्टेंबरनंतरही राज्यात लॉकडाऊन कायम राहणार! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सूतोवाच

Next

मुंबई/ठाणे : जूनपासून देशात ‘मिशन बिगीन अगेन’ सुरू झाले. देशातील काही राज्यांनी पटापट निर्णय घेऊन व्यवहार सुरळीत सुरू केले असले तरी महाराष्ट्र सरकार तशी घाई करणार नाही. त्यामुळे १ सप्टेंबरनंतरही राज्यात लॉकडाऊन कायम राहील, असे सूतोवाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

ठाण्यात कोरोनाबाबत केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी ठाकरे सोमवारी आले होते. महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांच्या समवेत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, मुख्य सचिव संजय कुमार आदी उपस्थित होते.

ठाकरे म्हणाले, जगभरातील काही देशांनीही काही गोष्टी घाईगडबडीने सुुरू केल्या. मात्र महाराष्ट्र अशी घाईगर्दी करणार नाही. कारण आपण ज्या गोष्टी सुरू केल्या आहेत, त्या पुन्हा बंद होणार नाहीत याची दक्षता घेऊन सुरू केल्या आहेत. पण, ज्या गोष्टी सध्या उघडणे शक्य नाही, किंवा त्या उघडल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव किती वाढेल, याची खात्री नाही त्या सुरू केल्या नसल्याचे ठाकरे म्हणाले.
ठाणेकरांनी सर्व नियम पाळून गणपती उत्सव साजरा केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले. गणेशोत्सवाआधी एक प्रश्न नेहमी विचारला जायचा की, उत्सव कसा साजरा होणार, विसर्जन कसे होणार, परंतु सर्वधर्मीयांनी सामाजिक जाणिवेतून उत्सव साजरे केले. त्यासाठी सर्वांना धन्यवाद देतो, असेही ते म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कळवा आणि मुंब्य्रात ११०० बेडच्या कोविड केअर सेंटरचे ई-लोकार्पण करण्यात आले. त्यामुळे कळवा आणि मुंब्य्रातील नागरिकांना फायदा होणार असल्याचे ते म्हणाले.

मुंबई आणि एमएमआरडीए क्षेत्रात मागील काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत होती. परंतु मागील महिनाभरात सर्वांनी अत्यंत खंबीरपणाने या साथीचा मुकाबला केल्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली. कोरोना रोखण्यात यश आल्यामुळे कौतुकाची थाप मिळाल्याने गाफील न राहता आपल्याला रुग्णसंख्या शून्यापर्यंत खाली आणायची आहे हे विसरू नका, असे ठाकरे यांनी महापालिकांच्या प्रशासनास बजावले.

शाळा-महाविद्यालये कधी उघडणार?
१ सप्टेंबरपासून शाळा उघडण्याबाबत केंद्र सरकार विचार करीत असले तरी राज्यातील शाळा इतक्यात उघडण्याची शक्यता नाही. सध्या ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. शिवाय, शैक्षणिक वर्ष जानेवारी ते डिसेंबर असे करण्यात यावे, असा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारपुढे ठेवला आहे. ११ वी प्रवेशासाठी सगळीकडे झुंबड उडालेली असली तरी नवीन शैक्षणिक वर्ष कधीपासून सुरू होणार याबाबत संभ्रम कायम आहे.

ई-पासबाबत मंत्रिमंडळात निर्णय
आंतरराज्य आणि आंतरजिल्हा प्रवासी वाहतुकीसाठी ई-पासचे बंधन हटविण्यात यावे, अशी सूचना केंद्र सरकारने केली असली तरी महाराष्ट्र सरकारने ती अद्याप अंमलात आणलेली नाही. बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत त्यावर चर्चा होऊन निर्णय होण्याची शक्यता आहे.

केडीएमसीत रुग्णसंख्या घटेल
कल्याण डोंबिवलीत कोरोनाबाधितांची वाढती संख्या रोखण्यासाठी काही महत्त्वाच्या उपाययोजना हाती घेतल्याने पुढील २० ते २५ दिवसांत रुग्णसंख्या झपाट्याने घटेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

रेस्टॉरंट, चित्रपटगृहे बंदच राहाणार
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्याची कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, राज्यातील रेस्टॉरंट, चित्रपटगृहे उघडली जाण्याची शक्यता कमीच आहे. मात्र, जिमबाबत येत्या दोन-तीन दिवसांत निर्णय होऊ शकतो.

Web Title: Lockdown will continue in the state even after September 1! Chief Minister Uddhav Thackeray's speech

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.