सानपाड्यात वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा
By admin | Published: January 20, 2017 02:51 AM2017-01-20T02:51:16+5:302017-01-20T02:51:16+5:30
सानपाडा जंक्शनवर वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे.
नवी मुंबई : सानपाडा जंक्शनवर वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. येथील सिग्नल यंत्रणा गेली अनेक महिने बंद असल्याने सुसाट वाहनांवर कोणतेही निर्बंध राहिलेले नाहीत. याचा परिणाम म्हणून गंभीर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सानपाडा रेल्वे स्थानकाच्या समोर सायन-पनवेल महामार्गावर हे जंक्शन आहे. स्थानकावरून एपीएमसी मार्केटकडे जाण्यासाठी याच जंक्शनचा वापर केला जातो. त्यामुळे येथून ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांची मोठ्याप्रमाणात वर्दळ असते. या ठिकाणी नियमित होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महामार्गावर उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. मुंबईकडे किंवा पनवेलकडे जाणारी वाहने या पुलाचा वापर करतात. परंतु एपीएमसी मार्केट, तुर्भे किंवा सानपाड्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी पुलाखालील जंक्शनचा वापर केला जातो. त्यामुळे पुलाखाली चारही बाजूने वाहनांची वर्दळ असते. येथील वाहतुकीचे नियमन व्हावे, यासाठी सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली आहे. मात्र मागील दोन-तीन महिन्यांपासून ही यंत्रणा बंद आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. रात्रीच्या वेळी एपीएमसीकडून येणाऱ्या वाहनांना महामार्गावरील वाहनांचा अंदाज येत नसल्याने अनेकदा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच रात्रीच्या वेळी एपीएमसीतून येणारी अवजड वाहने वाशी सेक्टर ३0 येथील वाहनतळावर पार्किंगसाठी जात असल्याने या जंक्शनवर वाहतूक कोंडी होते. जंक्शनच्या अगदी लगत मुंबईकडे जाणाऱ्या महामार्गावर नेहमीच खासगी प्रवासी वाहनांचा डेरा असतो. त्यामुळे या परिसरात नेहमीच अनागोंदीचे वातावरण दिसून येते. यातच सिग्नल यंत्रणा बंद असल्याने वाहनधारक अगदी बेशिस्तीने
येथून मार्ग काढतात. या सर्वांचा परिणाम म्हणून हे जंक्शन धोकादायक बनले असून मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
>वाहतूक पोलिसांची बघ्याची भूमिका
अनेकदा या पुलाखाली वाहतूक पोलीस तैनात असतात. परंतु वाहतुकीला शिस्त लावण्याचा कोणताही प्रयत्न त्यांच्याकडून होताना दिसत नाही. येथे उभे राहून ते केवळ बघ्याची भूमिका घेतात. यासंदर्भातसुध्दा कार्यवाही होण्याची गरज असल्याचे वाहनधारकांचे मत आहे.