Lok Sabha 2024: महाराष्ट्र-बिहारमधील देशभक्त पक्ष बिघडवणार भाजपाचं गणित? संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2023 01:22 PM2023-06-01T13:22:46+5:302023-06-01T13:23:29+5:30
Lok Sabha Election 2024: वर्षभरावर आलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच विरोधी पक्षांनी कंबर कसली आहे. १२ जून रोजी पाटणा येथे होणाऱ्या विरोधी पक्षांच्या महत्त्वाच्या बैठकीवरून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी एक सूचक विधान केलं आहे.
वर्षभरावर आलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच विरोधी पक्षांनी कंबर कसली आहे. १२ जून रोजी पाटणा येथे होणाऱ्या विरोधी पक्षांच्या महत्त्वाच्या बैठकीवरून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी एक सूचक विधान केलं आहे. संजय राऊत म्हणाले की, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सर्व दिग्गज नेते जे भाजपासोबत नाही आहेत, तसेच ज्यांना २०२४ मध्ये बदल घडवून आणायचा आहे. त्या सर्व देशभक्त दलांना १२ जूनच्या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याही नावांचा समावेश आहे. आम्ही पाटण्याला जाण्याबाबत विचार करत आहोत. संजय राऊत यांच्या या विधानामुळे विरोधी पक्षांच्या बैठकीमध्ये २०२४च्या लोकसभा निवडणुकीसाठीच्या आघाडीबाबत अनेक मोठे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी विरोधी पक्षांची एकजूट करण्याच्या अभियानांतर्गत देशभरातील विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करत आहेत. समान विचारसरणी असलेले पक्ष एकत्र येत आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार याचं नेतृत्व करत आहेत, असे संजय राऊत यांनी सांगितले.
याआधी बिहारचे मंत्री आणि जेडीयूचे दिग्गज नेते विजय कुमार चौधरी यांनी सांगितले की, भाजपाला विरोध करणारे बहुतांश विरोधी पक्ष या महत्त्वाच्या बैठकीत सहभागी होऊ शकतात. नितीश कुमार यांनी विरोधी ऐक्याच्या मोहिमेंतर्गत मे महिन्यामध्ये मुंबईत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.
आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षासमोर सर्वात मोठं आव्हान हे कुणाच्या नेतृत्वाखाली लोकसभेची निवडणूक लढायची हे असेल. विरोधी पक्षांकडे नितीश कुमार, शरद पवार, ममता बॅनर्जी, राहुल गांधी आदी बडे नेते आहेत. त्यातील कुठल्या एका नेत्याच्या नावावर सर्व पक्षांमध्ये एकमत होईल का, हे पाहावे लागेल.