'नेत्यांच्या निधनानंतर सहानुभूतीची लाट, मग शेतकरी आत्महत्येनंतर का नाही' ?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2019 12:54 PM2019-04-08T12:54:39+5:302019-04-08T12:56:43+5:30
नेत्यांच्या निधनानंतर त्यांचे वारस केवळ सहानुभूतींवर निवडून येतात. परंतु, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियाला कायम वाऱ्यावर का सोडलं जातं, असा सवाल करत वैशाली येडे यांनी आपला प्रचार सुरू केला आहे.
मुंबई - देशाच्या इतिहासात अनेक अशा घटना आहेत, ज्यामध्ये राजकीय नेत्याचे निधन झाल्यानंतर सहानुभूतीची लाट येते. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या हत्येनंतर देशात सहानुभूतीची अशीच लाट आली होती. राज्यातही केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर बीडमध्ये त्यांची कन्या प्रितम मुंडे सहानुभूतीच्या लाटेमुळे रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून आल्या होत्या. मात्र अशी लाट शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबासाठी का येत नाही, असा सवाल प्रहारच्या यवतमाळ मतदार संघातील लोकसभेच्या उमेदवार वैशाली येडे यांच्याकडून उपस्थित करण्यात येत आहे.
नेत्यांच्या निधनानंतर त्यांचे वारस केवळ सहानुभूतींवर निवडून येतात. परंतु, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियाला कायम वाऱ्यावर का सोडलं जातं, असा सवाल करत वैशाली येडे यांनी आपला प्रचार सुरू केला आहे. राजकारणाचे शुद्धीकरण करायला हवं, सर्वसामान्यांना ही लोक प्रतिनिधीत्व करायला मिळावं, अशी टॅग लाईन वैशाली येडे यांच्या प्रचारात देण्यात आली आहे.
वैशाली येडे आत्महत्याग्रस्त कुटुंबातील असून त्यांच्या पतीने कर्जबाजारीपणाला आणि सततच्या नापिकीला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यांना प्रहार संघटनेने लोकसभेचे तिकीट दिले आहे. याआधी त्यांनी एसटी बसमधून आपल्या प्रचाराला सुरुवात केली होती. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरलो असल्याचे वैशाली सांगतात.
वैशाली यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील रहिवासी आहेत. त्यांच्या पतीने ७ वर्षांपूर्वी आपली जीवनयात्रा संपवली होती. परंतु, दुःखावर मात करत दोन मुलांचा सांभाळ करणाऱ्या वैशाली यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या व्यथा मांडण्याचे काम केले आहे. यवतमाळ येथे झालेल्या आणि गाजलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन वैशाली यांच्या हस्ते झाले होते.