Lok sabha Election 2019 : शिवसेनेच्या हिंगोलीसाठी भाजपची 'फिल्डींग' ?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 11:38 AM2019-03-15T11:38:49+5:302019-03-15T11:50:22+5:30

शिवसेना आपला गड असलेला हिंगोली मतदार संघ भाजपला देणार का, दिल्यास त्या बदल्यात काय घेणार हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे. 

Lok sabha Election 2019: BJP interested for Hingoli | Lok sabha Election 2019 : शिवसेनेच्या हिंगोलीसाठी भाजपची 'फिल्डींग' ?

Lok sabha Election 2019 : शिवसेनेच्या हिंगोलीसाठी भाजपची 'फिल्डींग' ?

googlenewsNext

औरंगाबाद - महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या मराठवाड्यात सध्या शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांसमोर पेच निर्माण होताना दिसत आहे. जालना मतदार संघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरुद्ध लढण्यासाठी शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना गळ घातलेली आहे. तर हिंगोली मतदार संघ आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी भाजपने 'फिल्डींग' लावण्यास सुरुवात केली आहे. यावरून आगामी लोकसभा निवडणुकीत मराठवाडा विभाग उभय पक्षांसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

2014 मध्ये शिवसेनेला हिंगोलीत केवळ 1632 मतांनी पराभव पत्करावा लागला होता. त्यांतरच्या घडामोडीवरून युती होणार नाही, असा अंदाज बांधून शिवाजी माने, ऍड. शिवाजी जाधव आणि शिवसेनेचे 2014 लोकसभा निवडणुकीचे पराभूत उमेदवार सुभाष वानखेडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. यापैकी ऍड. जाधव यांना भाजपकडून उमेदवारीचे गाजर दाखविण्यात आले होते. परंतु, अखेरच्या टप्प्यात शिवसेना-भाजप युती झाल्यामुळे ऍड. जाधव यांच्यासह शिवाजी माने आणि सुभाष वानखेडे यांची गोची झाली आहे. 

शिवसेनेकडून हिंगोली मतदार संघात निवडणूक लढविण्यासाठी माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा आणि आमदार हेमंत पाटील यांच्यात चढाओढ आहे. येथील उमेदवारीसाठी शिवसेनेत खलबते सुरू आहे. दुसरीकडे इतर पक्षांना हाताशी धरून भाजपचे पधाधिकारी हिंगोली मतदार संघ आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी भाजपकडून धक्कातंत्र वापरण्याची शक्यता आहे. यात भाजपला यश आल्यास शिवसेनेचा गड असलेला हिंगोली मतदार संघ भाजपला मिळेल. परंतु त्या बदल्यात काय, असा पेच भाजपसमोर निर्माण होणार आहे.

भाजपवासी झालेले ऍड. शिवाजी जाधव, शिवाजी माने आणि सुभाष वानखेडे यांनी देखील इतर पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून मतदार संघच भाजपच्या झोळीत पाडून घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडे असलेली ही जागा मिळविण्यासाठी भाजपमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे.

सर्वेक्षणात भाजपसाठी अनुकूल स्थिती ?

हिंगोली मतदार संघात गेल्यावेळी शिवसेनेचे सुभाष वानखेडे यांचा थोडक्यात पराभव झाला होता. मोदी लाट असताना काँग्रेसला हा मतदार संघ जिंकण्यात यश आले होते. यंदा मोदी लाट ओसरली असली तरी सर्वेक्षणात हिंगोली मतदार संघात भाजपसाठी परिस्थिती अनुकूल असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भाजप ही जागा मिळविण्यासाठी प्रयत्न करणार हे स्पष्टच आहे. मात्र शिवसेना आपला गड असलेला हिंगोली मतदार संघ भाजपला देणार का, दिल्यास त्या बदल्यात काय घेणार हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे. 
 

Web Title: Lok sabha Election 2019: BJP interested for Hingoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.