'ईडी'ची पिडा टळण्यासाठी उद्धव ठाकरे अफजल खानाच्या शामियान्यात : मुंडे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 01:09 PM2019-04-26T13:09:44+5:302019-04-26T13:10:54+5:30
काही दिवसांपूर्वी गांधीनगर येथून अमित शाह यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्धव ठाकरे आवर्जून उपस्थित होते. त्यावेळी उद्धव अफजल खानाला मुजरा घालून जय गुजरात म्हणून आल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.
पुणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आलेल्या टीकेला राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली. केवळ ईडीच्या भितीमुळे उद्धव ठाकरे भाजपला सामील झाल्याचा आरोप मुंडे यांनी केला.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचा उल्लेख अफजल खान असा केला होता. तसेच मराठी माणसाने शिवसेनेला मतदान करण्याचे आवाहन केले होते. काही दिवसांपूर्वी गांधीनगर येथून अमित शाह यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्धव ठाकरे आवर्जून उपस्थित होते. त्यावेळी उद्धव अफजल खानाला मुजरा घालून जय गुजरात म्हणून आल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.
तसेच 'ईडा पिडा टळू दे आणि बळीचं राज्य येऊ दे, यासाठी उद्धव यांनी भाजपसोबत युती केली नसून केवळ 'ईडी'च्या भितीच्यामुळे उद्धव ठाकरे अफजल खानाच्या शामियान्यात दाखल झाल्याची घणाघाती टीका धनंजय मुंडे यांनी केली. चार मंत्रीपदाच्या तुकड्यांसाठी शिवसेना कमळाबाईच्या मागे फिरत आहे. एवढी लाचार शिवसेना मी कधीच पाहिली नाही. मराठवाड्यात शिवसेनेला चिवसेना म्हणतात. त्यामुळे गावावात असलेल्या शिवसेनेच्या पाट्यावरचा वाघाचं चित्र काढून चिमणीचं चित्र लावा, असा खोचक सल्ला धनंजय मुंडे यांनी शिवसेनेला दिला.