बीडमध्ये ईव्हीएम हॅकींगचा प्रकार तर सुरू नाही ना ?: धनंजय मुंडे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2019 05:48 PM2019-05-21T17:48:06+5:302019-05-21T17:50:03+5:30
विरोधीपक्षनेता धनंजय मुंडेनी सुद्धा मतमोजणीपूर्वी ईव्हीएम बाबत प्रश्न चिन्ह उपस्थित क्ले आहे.
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला काही तास शिल्लक राहिले असताना विरोधक ईव्हीएम मशीनबद्दल शंका उपस्थित करत असताना दिसत आहे. विरोधीपक्षनेता धनंजय मुंडेनी सुद्धा मतमोजणीपूर्वी ईव्हीएम बाबत प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे. बीडमध्ये भाजपकडून मतदान न होणाऱ्या बूथची यादी मागवली जात असल्याचा आरोप धनंजय मुंडेनी केला आहे.
बीड जिल्हात आजपर्यंत भाजपला ज्या बूथवर कधीच मतदान मिळाले नाही, अशा बूथची यादी बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांकडून मागवली आहे. दोन दिवसांवर मतमोजणी आली आहे. अश्यावेळी मतदान न झालेल्या बुथची यादी कशाला पाहिजे. पुन्हा ईव्हीएम हँकिंगचा प्रकार तर नाही ना ? असा सवाल धनंजय मुंडेनी उपस्थित केला आहे. हा प्रकार फक्त बीडच नाहीतर अनेक ठिकाणी होत असल्याचा आरोप सुद्धा धनंजय मुंडेनी केला आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.
दोन दिवसांत निवडणुकींचा निकाल जाहीर होणार असताना बीडच्या पालकमंत्र्यांना भाजपला मतदान न होणाऱ्या बूथची यादी हवीच कशाला? हा #EVM हॅकींगचा प्रकार तर सुरू नाही ना? https://t.co/loBpjCuq30
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) May 21, 2019
बीड लोकसभा मतदार संघातून भाजपकडून खासदार प्रीतम मुंडे तर राष्ट्रवादीने बजरंग सोनवणे यांना रिंगणात उतरवले होते. महाराष्ट्राच्या राजकरणाचा केंद्रबिंदू म्हणून बीड मतदार संघाकडे बघितले जाते. मात्र, मतमोजणी आधीच धनंजय मुंडेनी केलेल्या आरोपामुळे बीड लोकसभा मतदारसंघ पुन्हा चर्चेत आले आहे.