'पंकजा ताई, शिकारी तगडा असला की, गुलेलने पण वाघिणीची शिकार होते'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 05:57 PM2019-04-15T17:57:43+5:302019-04-15T18:06:47+5:30
मोठ्यांची लेक असल्यामुळे तुम्ही वाघिण झाल्या आणि शेतकऱ्याचा पोरगा आहे म्हणून बजरंग हा गुलेर झाला. एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन टीका करताना हा शेतकऱ्याच्या मुलाचा अपमान नाही, का असा सवाल धनंजय मुंडेंनी केला.
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात मतदान होणाऱ्या सर्वच मतदारसंघातील प्रचार शिंगेला पोहचला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील केंद्रबिंदू म्हणून ओळख असलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात बहीण-भावांचे एकमेकांवर सुरू असलेल्या टीका थांबायच नाव घेत नाही. बीड लोकसभा मतदारसंघात उमेदवारांपेक्षा पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचीच जास्त चर्चा आहे.
बीड लोकसभा मतदारसंघातून युतीच्या उमेदवार प्रीतम मुंडेच्या यांनी उमेदवारी दाखल केल्यानंतर झालेल्या सभेत, राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडेंनी विरोधीपक्षनेते धनंजय मुंडेंवर टीका केली होती. राष्ट्रवादी पक्षाला काही कळत नाही, वाघिणीची शिकार करायला गुलेलचा वापर करत नसतात असा टोला त्यांनी धनंजय मुंडेना लागवला होता. धनंजय मुंडेंनी याला उत्तर देत पंकजा मुंडे यांच्यावर तोफ डागली.
शिकारी जर निबार असेल तर गुलेलने पण वाघिणीची शिकार करता येते, असा पलटवार करत पंकजा मुंडेंचा समाचार घेतला. पंकजा मुंडेंना कसला गर्व आला आहे. दोन दिवसानंतर प्रचार संपणार पण अजून मला कळलेच नाही की उमेदवार मी आहे की बजरंग सोनवणे आहे. मोठ्यांची लेक असल्यामुळे तुम्ही वाघिण झाल्या आणि शेतकऱ्याचा पोरगा आहे म्हणून बजरंग हा गुलेर झाला. एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन टीका करताना हा शेतकऱ्याच्या मुलाचा अपमान नाही, का असा सवाल धनंजय मुंडेंनी केला.
बीड लोकसभा मतदारसंघात दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या प्रीतम मुंडे यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे रिंगणात आहे.मात्र खरी लढत मुंडे विरोधात मुंडे अशी बनली आहे.