Lok Sabha Election 2019 : विशाल पाटील यांच्याआडून ‘गेम’ कुणाचा..?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 01:18 PM2019-03-29T13:18:45+5:302019-03-29T14:52:39+5:30
सांगली लोकसभा मतदार संघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आम्हांला पाठिंबा द्यावा अशी विनंती काँग्रेसचे नेते विशाल प्रकाश पाटील व माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतिक पाटील यांनी खासदार राजू शेट्टी यांच्याकडे आज शुक्रवारी सकाळी केली.
विश्र्वास पाटील
कोल्हापूर : सांगली लोकसभा मतदार संघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आम्हांला पाठिंबा द्यावा अशी विनंती काँग्रेसचे नेते विशाल प्रकाश पाटील व माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतिक पाटील यांनी खासदार राजू शेट्टी यांच्याकडे आज शुक्रवारी सकाळी केली.
खासदार शेट्टी, व या दोन भावांमध्ये त्यासाठी शेट्टी यांच्या शिरोळमधील निवासस्थांनी सुमारे दीड तास बंद खोलीत चर्चा झाली. परंतू शेट्टी यांनी त्यांना स्वाभिमानी संघटेच्या चिन्हांवरच आपण ही निवडणूक लढवावी, तुम्ही अपक्ष म्हणून लढणार असाल तर मला पाठिंबा देता येणार नाही असे स्पष्ट केले.
त्यामुळे त्यांनी आम्ही वसंतदादा गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्याबाबतचा निर्णय आज-उद्या कळवितो असे सांगितले आहे. विशाल यांना ‘अपक्ष’लढवून कुणाचा तरी राजकीय गेम करण्याच्या हालचाली आकारास येत असल्याचे चित्र आहे.
मिळालेल्या माहितीनुसार यामध्ये विशाल पाटील दुहेरी गेम खेळत असल्याचे चित्र पुढे आले आहे. सांगलीच्या राजकारणात भाजपचे खासदार संजय पाटील यांना पक्षाअंतर्गत विरोध आहे. तो विरोध कुणाचा आहे हे सगळ््या पश्चिम महाराष्ट्राला माहित आहे. त्याच लॉबीला संजय पाटील यांचा पराभव करायचा आहे. त्यासाठी विशाल पाटील यांना वाट्टेल ती मदत करायची या लॉबीची तयारी आहे.
संजय पाटील पराभूत व्हायला हवेत परंतू भाजपची तरी एक जागा कमी होता कामा नये असे या लॉबीचे प्रयत्न आहेत. त्यामुळे विशाल पाटील यांनी त्यासाठी अपक्ष निवडणूक लढवली पाहिजे अशीही जोडणी आहे. विशाल पाटील हे जर स्वाभिमानी संघटनेकडून लढले, तर त्यांना मदत करून निवडून आणण्यात या लॉबीला कांही रस नाही. कारण तसे झालेच तर एक जागा राष्ट्रवादीच्या कोट्यातील वाढते.
स्वाभिमानी संघटनेकडून लढायचे झाल्यास पैसा कोण घालणार या सुध्दा विशाल पाटील यांच्यापुढे मोठा प्रश्र्न आहे. आर्थिक मदत करण्याची संघटनेला मर्यादा आहे. शेट्टी यांच्या प्रतिमेवर त्यांना जशी कोल्हापूरात मदत मिळते तशी प्रस्थापित राजकारणी असल्याने विशाल पाटील यांना ती सांगलीतून मिळणार नाही. त्यामुळेही विशाल पाटील स्वाभिमानीचा झेंडा हातात घेवून मैदान उतरतात का याबध्दल साशंकताच जास्त आहे. काँग्रेसलाही विशाल पाटील हे आपल्याबरोबर दुहेरी गेम करत असल्याचे वाटते.
सांगलीची जागा काँग्रेसने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिली आहे. त्याची माहिती गुरुवारीच खासदार शेट्टी यांनी येथे पत्रकारांना दिली होती. परंतू आमचा अजून उमेदवार ठरलेला नाही. त्याबाबतचा सस्पेंन्स दोन दिवसांत उघड करू असे शेट्टी यांनी सांगितले होते. व्यक्तिगत शेट्टी आणि प्रतिक पाटील यांच्यामध्ये अत्यंत घनिष्ठ संबंध आहेत. सांगलीची जागा काँग्रेसने आम्हांला दिली आहे, त्यासाठी आम्ही काय ताकद पणाला लावली नव्हती.
आम्ही तीन जागा काँग्रेसल्या सुचविल्या होत्या असे शेट्टी यांचे म्हणणे आहे. त्यामुळे वसंतदादा घराण्याचाही सन्मान व्हावा व संघटनेकडेही ही जागा राहावी यासाठी सांगलीतून स्वाभिमानीकडून विशाल पाटील यांनीच निवडणूक लढवावी असा प्रस्ताव दिला आहे. त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न काँग्रेसचे आमदार सतेज पाटील व प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या पातळीवरही सुरु आहेत.
संघटनेकडून वैभव नायकवडी, अरुण लाड किंवा गोपीचंद पडळकर या तिघांशी संपर्क साधण्यात आला आहे. विशाल पाटील हे तयार नाही झाले तर यांच्यापैकी कोणतरी एकजण उमेदवार होवू शकतात.