Video: झोपा काढू नका, उठा अन् मतदान करा; बाळासाहेब ठाकरेंचा 'आवाssज'!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 11:15 AM2019-04-29T11:15:53+5:302019-04-29T11:18:27+5:30
मुंबई आणि महाराष्ट्रातल्या बांधवांना, भगिनींना आवाहन
मुंबई: शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरेंचा आवाज महाराष्ट्रालाच नव्हे, तर संपूर्ण देशाला परिचयाचा आहे. ठाकरी शैलीतली त्यांची गर्जना कित्येक दशकं देशात गाजली. आज मुंबई, ठाण्यासह राज्यातल्या 17 लोकसभा मतदारसंघात मतदान सुरू असताना पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरेंचा आवाज ऐकू आला. झोपा काढू नका, उठा अन् मतदान करा, असा मतदारांना खडबडून जागं करणारा आवाज सोशल मीडियावर ऐकू येत आहे. आवाजाचे जादूगार चेतन शशीतल यांनी बाळासाहेबांच्या आवाजात सर्वसामान्यांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.
बाळासाहेबांनी दिलेली प्रत्येक सूचना शिवसैनिकांनी आदेश मानली. शिवसैनिकांसोबतच कोट्यवधी मराठी माणसांच्या मनात बाळासाहेबांना आदराचं स्थान आहे. त्यामुळेच डबिंग आर्टिस्ट चेतन शशीतल यांनी बाळासाहेबांच्या आवाजात मुंबईकरांना आणि महाराष्ट्रातील जनतेला मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. 'मुंबईकर आणि महाराष्ट्रातले माझे सर्व बांधव, भगिनींनो.. घरी बसून झोपा काढू नका, उठा आणि मतदान करा.. आपल्या देशाचं भवितव्य तुमच्या हातात आहे..', असं आवाहन शशीतल यांनी केलं आहे.
25 जानेवारीला प्रदर्शित झालेल्या 'ठाकरे' चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकींनी बाळासाहेबांची भूमिका साकारली होती. मराठीत अभिनेते सचिन खेडेकर यांनी बाळासाहेबांच्या व्यक्तीरेखेला आवाज दिला होता. मात्र त्याबद्दल सोशल मीडियावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. खेडेकर यांच्याऐवजी चेतन शशीतल यांचा आवाज वापरला जावा, असा सूर सोशल मीडियावर व्यक्त झाला. त्याआधी बाळकडू चित्रपटात चेतन यांनी बाळासाहेबांचा आवाज दिला होता.