खोतकरांचे बंड केले थंड; आता जावयाचे काय ? दानवेंसमोर पेच
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 10:37 AM2019-03-19T10:37:11+5:302019-03-19T10:38:04+5:30
हर्षवर्धन जाधव यांच्या आक्रमक पावित्र्यावर शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी दानवे यांच्याकडे बोट दाखवले होत. तसेच हर्षवर्धन हे दानवे यांचे जवाई असून ही समस्या तेच सोडवतील असे म्हटले होते.
औरंगाबाद - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. जालना लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी आक्रमक असलेले शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांचे बंड शांत केल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासमोर पुन्हा एकदा पेच निर्माण झाला आहे. दानवे यांचे जावई आणि शिवसेनेचे बंडखोर आमदार हर्षवर्धन जाधव यांनी औरंगाबाद लोकसभा निवडणूक लढण्यासाठी आक्रमक पावित्रा घेतला आहे. तसेच काँग्रसकडून त्यांचे नाव आघाडीवर आहे. त्यामुळे दानवे यावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
याआधीच हर्षवर्धन जाधव यांनी लोकसभा निवडणुकीत उतरण्याचा निर्धार केला आहे. होय, मी उभं राहणारच, असे म्हणत शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांच्याविरुद्ध निवडणूक लढवणार असल्याचे हर्षवर्धन यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. विशेष म्हणजे, याबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याशी माझी बोलणी झाल्याचेही जाधव यांनी सांगितले.
हर्षवर्धन यांच्या आक्रमक पावित्र्याविषयी शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली होती, त्यावर त्यांनी दानवे यांच्याकडे बोट दाखवले होत. तसेच हर्षवर्धन हे दानवे यांचे जवाई असून ही समस्या तेच सोडवतील असे म्हटले होते. त्यामुळे आता हर्षवर्धन यांचा पेच दानवे कसा सोडवणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
दरम्यान खैरे शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार असून त्यांच्यासाठी दानवे यांना औरंगाबादमध्ये सभा घ्यावी लागणार आहे. त्यामुळे जावईविरुद्ध सासरे असा सामना रंगणार की, अर्जुन खोतकर यांच्याप्रमाणेच ते जावयाची समजूत काढणार हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे.