आपलं नाव मतदारयादीत आहे का?... 'या' लिंकवर तपासा, मतदान केंद्रही जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 11:54 AM2019-04-17T11:54:07+5:302019-04-17T11:55:12+5:30
देशातील ९७ मतदारसंघांमधील उमेदवारांचं भवितव्य उद्या इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनमध्ये बंद होणार आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्याचं मतदान उद्या १८ एप्रिलला होणार आहे. देशातील ९७ मतदारसंघांमधील उमेदवारांचं भवितव्य इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनमध्ये बंद होणार आहे. या ९७ मतदारसंघापैकी १० मतदारसंघ महाराष्ट्रातील आहेत. अमरावती, अकोला, बुलडाणा, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी आणि सोलापूर या जागांसाठी दिग्गज, ताकदीचे उमेदवार रिंगणात उतरलेत. अकोला आणि सोलापूरमध्ये अॅड. प्रकाश आंबेडकर रिंगणात असल्यानं तिरंगी लढत होण्याची चिन्हं आहेत. तर, अन्य ठिकाणी प्रामुख्याने युती विरुद्ध आघाडी असाच सामना रंगणार आहे. या पार्श्वभूमीवर, आपलं नाव मतदारयादीत आहे की नाही आणि आपलं मतदानकेंद्र कोणतं, हे जाणून घेण्यासाठी खालील लिंक आपल्याला उपयुक्त ठरेल.
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात सात मतदारसंघांत मतदान झालं. दुसऱ्या टप्प्यात दहा मतदारसंघात होतंय. त्यानंतर, तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यांत अनुक्रमे १४ आणि १७ मतदारसंघांत मतदान होणार आहे. तिसरा टप्पा २३ एप्रिलला, तर चौथा टप्पा २९ एप्रिलला आहे. या मतदारसंघांमधील मतदारांनीही आपलं नाव मतदार यादीत आहे की नाही, हे तपासून पाहावं. लोकशाही व्यवस्थेत मतदानाचा अधिकार हा सर्वात मोठा हक्क आहे. ते आपलं कर्तव्यच आहे. त्यामुळे बजावण्यासाठी आपणही खबरदारी घेतलेली बरी.
मतदान केंद्रावर गेल्यानंतर किंवा मतदानाला जाताना एखाद्या पक्षाच्या बूथवर बरेच जण आपलं नाव, नंबर तपासून पाहतात. परंतु, हेच काम ऑनलाइन करणं अगदी सोपं आहे. खालील लिंकवर क्लिक करून आपलं नाव, वडिलांचं किंवा पतीचं नाव, जन्मतारीख, राज्य, जिल्हा, विधानसभा मतदारसंघ ही माहिती भरा. सगळी आवश्यक माहिती काही सेकंदात तुमच्यासमोर प्रकट होईल.
मतदार यादीतील नाव तपासण्यासाठी इथे क्लिक करा.
दस का दम... दहा मतदारसंघात कोण-कोण आहे रिंगणात?