Lok Sabha Election 2019 : सुरक्षेच्या प्रश्नामुळे जम्मू काश्मीर विधानसभेची निवडणूक लांबणीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2019 06:22 PM2019-03-10T18:22:37+5:302019-03-10T18:23:54+5:30
सुरक्षेच्या कारणामुळे जम्मू काश्मीरमधील विधानसभेची निवडणूक लोकसभा निवडणुकीसोबत न घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.
नवी दिल्ली - केंद्रीय निवडणूक आयोगाने 17 व्या लोकसभा निवडणुकीसाठीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. दरम्यान, जम्मू काश्मीर विधानसभेसाठीही लोकसभेसोबत मतदान होणार अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र सुरक्षेच्या कारणामुळे जम्मू काश्मीरमधील विधानसभेची निवडणूक लोकसभा निवडणुकीसोबत न घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.
भाजपाने मेहबुबा मुफ्ती सरकारचा पाठिंबा काढल्यानंतर नवे सरकार स्थापन होऊ न शकल्याने राज्यात राज्यपाल शासन लागू करण्यात आले होते. त्यानंतर सहा महिन्यांनी राज्यात राष्ट्रपती शासन लागू झाले होते. दरम्यान, नियंत्रण रेषेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरमध्ये लोकसभा निवडणुकीसोबत विधानसभा निवडणुका घेता येतील का याची चाचपणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून करण्यात आली होती. मात्र अखेरीस सुरक्षेच्या कारणास्तव जम्मू काश्मीर विधानसभेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे.
CEC: Based on input, constraint of availability of central forces&other logistics, requirement of forces for security of candidates in wake of recent violence & keeping other challenges in mind EC has decided at this stage to announce only schedule of Parliament election in J&K. pic.twitter.com/oy4Io6FONm
— ANI (@ANI) March 10, 2019
सुरक्षा व्यवस्थेची उपलब्धता, काश्मीर खोऱ्यात सध्या झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची सुरक्षा आणि इतर आव्हाने विचारात घेऊन सध्याच्या घडीला जम्मू आणि काश्मीरमध्ये केवळ लोकसभा निवडणूक घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली होती.